अमरावती : महापौर पदाच्या निवडणुका या नियोजित कालावधीतच होणार असल्याने अमरावती महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण आॅगस्ट महिन्याअखेर घोषित होण्याचे संकेत आहे. आतापर्यंत महापौरपदी आरक्षणानुसार विराजमान झालेल्या प्रवर्गाची आकडेवारी बघता यंदा सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तीला महापौरपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.या सत्रातील दुसऱ्या महापौर पदासाठी अनेक इच्छुक असून आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. १४ व्या महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. मात्र हल्ली महापालिकेत निर्माण झालेले राजकीय वातावरण बघता महापौरपदाच्या निवडणुकीत काही वेगळेच चित्र राहील, अशी शक्यता आहे. महिन्याभरात महापौरपदांची निवडणूक लागण्याचे संकेत आहे. त्यानुसार महापालिकेत राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु आहेत. महापालिकेत आघाडीची सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अंतर्गत भांडणात गुरफटली आहे. आघाडीच्या अंतर्गत करारानुसार येत्या महापौर पदावर राष्ट्रवादीचा दावा आहे. मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आता आटोक्याबाहेरचा झाला आहे.
आॅगस्टअखेर महापौरपदाचे आरक्षण होणार जाहीर
By admin | Updated: August 10, 2014 22:44 IST