अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने पुकारलेले आंदोलन विद्यापीठ प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मागण्या पूर्ण करण्याकरिता विद्यापीठाने २० सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनेच्या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरु ठेवून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला होता. पदोन्नती प्रकरणे निकाली काढावी, परिक्षा विभागाचे संगणिकरण करावे, कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, मनुष्यबळ वाढविण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून विद्यापीठ परिसरात निदर्शने केली होती. यावेळी कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्माक चर्चा करुन त्यांना मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. येत्या २० सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)
लेखी आश्वासनानंतर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
By admin | Updated: September 10, 2014 23:18 IST