अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणी आरक्षणाचे करोडो रूपयांची थकीत असणाऱ्या पंचतारांकित वसाहतीमधील इंडियाबुल्स कंपनीच्या सोफिया प्रकल्पाची खरेदी करण्यासाठी औष्णिक प्रकल्प असणाऱ्या अदानी ग्रुपने पाहणी केल्याची माहिती आहे. या ग्रुपचे संचालक व अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत तीन वेळा पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पातून १२३.५२ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले. या आरक्षित पाण्याच्या करापोटी १५० कोटीवर रक्कम थकीत असल्याची माहिती मिळाली. केवळ दोन टप्प्याची रक्कम कंपनीद्वारा भरण्यात आली. मे २०१२ पासून तूर्तास पाचवा टप्पा सुरू आहे. पाणी वाटपाच्या करारनाम्या संदर्भात कंपनीने न्यायालयात धाव घेतली. याचसंदर्भात विधी मंडळात चर्चाही करण्यात आली. सोफीया औष्णिक वीज प्रकल्प स्थापनेपासून तर पूर्ण होईपर्यंत कुठल्या ना कुठल्या वादात अडकल्याचे दिसून आले. अशातच या प्रकल्पावर थकीत रक्कम वाढत असल्याने पुन्हा चर्चेला पेव फुटले. थकीत रकम वाढत असतानाच हा प्रकल्प खरेदी करण्यासंदर्भात औष्णीक वीज प्रकल्पातील कंपनी अदानी ग्रुपद्वारा पाहणी करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे. यासंदर्भात प्रकल्पाच्या व्यवस्थापनासी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
सोफिया प्रकल्पावर अदानी ग्रुपची नजर!
By admin | Updated: September 13, 2014 00:53 IST