अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील १३८ शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी, तर २६२ शाळांची पटसंख्या ११ ते २० च्या दरम्यान आहे. अशा एकूण ४०० अशा शाळांवर संक्रांत येणार नाही ना, अशी भीती शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, कॉन्व्हेंटच्या वाढत्या संस्कृतीमुळे झेडपीच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या कमी होत आहे. त्यातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या तुलनेत खासगी शाळा कितीतरी पुढे आहेत. कॉन्व्हेंटसोबतच या शाळांची पटसंख्या वाढत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत कुठे १०, तर २० पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यात जिल्ह्यातील १३८ शाळांत दहापेक्षा कमी, तर २६२ शाळांत २० पटसंख्या आहे. त्यामुळे अशा शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्राच्या शाळांचे समायोजन केले जाणार नाही ना, असा प्रश्न शिक्षक व पालकांना भेडसावत आहे.
बॉक्स
अशी आहे आकडेवारी
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या १५८३
दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा १३८
विसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा २६२
बॉक्स
तालुकानिहाय या शाळांचे होणार समायोजन
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील ३२,अमरावती ३३,महापालिका क्षेत्र १, अंजनगाव सुर्जी ३७, भातकुली ५१,चांदूर बाजार ३३,चांदूर रेल्वे १७,दर्यापूर ५०, धामणगाव रेल्वे १३,धारणी ८,मोर्शी २२,नांदगाव खंडेश्र्वर २८, तिवसा वरूड २६ अशा एकूण १० ते २० पटसंख्येच्या २१, ४०० शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे. त्यामुळे शासन धोरणानुसार या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळा समायोजन करण्याची प्रक्रिया पार पाडणे अपेक्षित होते. तथापि तांत्रिक कारणामुळे या शाळा बंद करण्यात आल्या नाहीत किंवा त्या शाळांची इतर शाळांत समायोजन करण्यात आले नाही.
कोट
२० पेक्षा कमी पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे शक्यतोवर नजीकच्या कमी अंतर असलेल्या मोठ्या शाळेत विद्यार्थाचे समायोजन करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. स्थानिक परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्याच्या सोईच्या दृष्टीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप कुठल्याही कमी पटसंख्येच्या शाळेचे समायोजन केलेले नाही.
- ई. झेड. खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक
बॉक्स
पालकांना तूर्तास दिलासा
शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करावे लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत. परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
त्या शाळांवर दोन शिक्षक!
नियमानुसार पटसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या नसल्या तरी त्यांचे समायोजन होणार नाही. या शाळातील प्रत्येकी दोनच शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे.