अमरावती : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्याने जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तके जतनाची गोडी लागावी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यात १४ हजार पालकांनी ८२ पुस्तके परत केली आहेत.
२०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या ३ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानातून पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनामुळे प्राथमिक विभागाच्या शाळा वर्षभर उघडल्याच नाहीत. तर, पाचवी ते आठवीच्या शाळा काही काळ उघडल्या व प्रत्यक्ष वर्ग भरले नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या फारसा वापर झाला नसल्याने ती सुस्थितीत आहेत. शिक्षणाधिकारी ए.झेड. खान, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी पुढाकार घेऊन पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी विनंती केली. त्याला पालकांनी प्रतिसाद दिला. पुढच्या वर्षासाठी ३ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांकरिता पुस्तकांच्या संचाची मागणी असेल. त्यात पुनर्वापरासाठी आलेल्या पुस्तकांमुळे कमी संच मागवावे लागतील. त्यामुळे शासनाचा पैसा तर वाचेलच. परंतु विद्यार्थ्यांना पुस्तके चांगल्याप्रकारे हाताळण्याची सवयही लागणार आहे.
-----------------
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली- ४०६३५
दुसरी- ४३७४५
तिसरी- ४५१०१
चौथी- ४३८७४
पाचवी-४४७२१
सहावी-४४०५४
सातवी- ४४४२०
आठवी- ४५५१६
००००००००००००
अशी आहे आकडेवारी
मागील वर्षी संच वाटप------------------- ३ लाख ५२ हजार
यावर्षी मागणी ----------------------- ३ लाख ३७ हजार
०००००००००००००
१४ हजार ८२ पालकांचा पुढाकार
- पुस्तके परत केलेल्या १४ हजार ८२ पालकांकडून ईतरही पालकांनी पुस्तके परत करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
- मराठी माध्यमांची ६००९, उर्दू माध्यमांची ४०२३ संच परत आले आहेत. ४०५० सेमी ईंग्रजीचेही येथून संच परत येणार असल्याचे शाळांनी शिक्षण विभागाला कळविले आहे.
- ८०६७ तिवसा, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातून सर्वाधिक पुस्तक संच परत मिळाले आहेत. धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर आदी तालुक्यातील शाळांतून सर्वात कमी संच परत मिळणार आहेत.
०००००००००००००००००
पालक म्हणतात.............
पुस्तके मोफत मिळत असली तरी विद्यार्थ्यांंना आपल्या पाल्याला निटनिटकेपणा मू्ल्याची जाणीव व्हावी, यासाठी पुस्तकांची निगा ठेवण्याचे भान त्यांना दिले पाहिजे. यातून अनेक फायदे आहेत. तसेच समाधानही आहे.
- वैशाली काळे, पालक,
----------------------------
कागद वाचला तर पर्यावरणाची हानी कमी होईल. हे भान पुस्तक पुनर्वापराच्या योजनेतून पाल्यांना मिळते आहे. पुस्तकांना योग्य कव्हर लावून वर्षभर विद्यार्थी पुस्तकांना जपतात. शिक्षकही त्याकडे लक्ष देतात. सर्व पालकांनी पुस्तके परत द्यायला हवी.
- ईमरानखॉ पठाण, पालक
------------------
समग्र शिक्षा अभियानातून दिलेले पुस्तक संच पुनर्वापरासाठी देण्याकरिता त्याची वर्षभर निगा राखावी लागते. आपणही पुस्तक परत देण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावू या भावनेतून पुस्तकांची निगा, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना कळेल. पालकही त्याकडे लक्ष देतील. त्यासंदर्भात शाळा स्तरावर शिक्षकही जनजागृती करीत आहे.
- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती