अकोला : जिल्ह्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उलटले असून, सणासुदीच्या दिवसात या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अकोला तालुक्यातील शेतकर्यांनी सोमवारी कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. कृषी अधीक्षकांना आकोटहून येण्यास विलंब झाल्याने शेतकर्यांनी या ठिकाणी नारेबाजी केली. त्यामुळे काहीवेळ येथे वातावरण तापल्याने कृषी विभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले.शेतकर्यांनी यावर्षी जिल्हय़ात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीन पेरणीसाठी शेतकर्यांनी महाबीजसह बियाणे निर्मिती करणार्या इतर २२ कंपन्यांचे बियाणे यावर्षी खरेदी केले होते; पंरतु या सर्व कंपन्यांचे बहुतांश बियाणे उलटल्याने शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे; परंतु शेतकर्यांना महाबीजने पन्नास टक्के दिलेली नुकसानभरपाई वगळता इतर खासगी बियाणे कंपन्या शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचे टाळत असल्याने शेतकरी नेते मनोज तायडे यांच्या नेतृत्वात अकोला तालुक्यातील शेतकर्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. ४ ऑक्टोबरला याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिल्याने संतप्त शेतकर्यांनी १२ वाजतापासून या कार्यालयावर मांडलेला ठिय्या चार वाजता उठवला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची उपस्थिती होती. या दोन्ही नेत्यांनी शेतकर्यांना शांत केले.
शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उलटले!
By admin | Updated: September 30, 2014 01:59 IST