अकोला: श्री गणेश ही विद्येची देवता. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजेतून करण्यात येते. श्री गणेशाचे स्थान हे प्राचीन काळापासूनच हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण आहे. जिल्हय़ातही काही गावांमध्ये प्राचीन मंदिरे असून, शेकडो वर्षांपासून श्री गणेशाची पूजा करण्यात येते. आकोट येथील सिद्धिविनायक मंदिरातील साडेचार फुटाची ही मूर्ती तीनशे वर्षे जुनी आहे.जिल्हय़ात सर्वच गावात श्री गणेशाची अनेक मंदिरे आहेत. त्यातच काही गावांमध्ये प्राचीन काळापासून बनविण्यात आलेली काही मंदिरे आहेत. हा भक्तीचा ऐतिहासिक ठेवा आहे. शेकडो वर्षांपासून भाविक मनोभावे या ठिकाणी पूजन करीत आहेत. आकोट येथे प्राचीन मूर्त्यांचा खजिना आहे. येथे विष्णूच्या तीन प्राचीन मूर्त्या आहेत. तसेच नंदी पेठेतील नंदी, भुलजा भुलईचे मंदिरही अनोखे व विशेष आहे. येथे सिद्धिविनायकाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात श्री गणेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती साडेचार ते पाच फुटांची असून, काळ्या पाषाणात कोरली आहे. काळ्या पाषाणात असलेली जिल्हय़ातील ही सर्वात मोठी मूर्ती आहे. मूर्ती आकर्षक असून, प्राचीन आहे. पेशवे काळापूर्वी नागपूरकर भोसल्यांच्या काळात मूर्ती बनविण्यात आली असावी, असा अंदाज इतिहास संशोधक अशोक टेमझरे यांनी वर्तविला आहे. या मंदिरासमोरच महादेवाचे शिवलिंग आहे. दगडाच्या असलेल्या या शिवलिंगावर पाच मुख कोरले आहेत. त्यामुळे याला पंचमुखेश्वर म्हणतात. मंदिर आताच्या काळात बनविले आहे. मंदिरावर शेगावचे गजानन महाराज, तुकाराम महाराज, विठ्ठल रुख्माई यांच्या मूर्त्या आहेत. पूर्वी या ठिकाणी छोटे मंदिर होते. शेकडो वर्षांपासून श्री गणेशाची पूजा भाविक करीत आहेत.
आकोटची सिद्धिविनायक गणेश मूर्ती भोसलेकालीन
By admin | Updated: September 2, 2014 19:55 IST