वाशिम: मोठा गाजावाजा करीत मागासवर्गीय शेतकर्यांना मोफत कृषीपंप जोडणी दिल्याचा डंका पिटणार्या यंत्रणेचे पितळ आता उघडे पडत आहे. दीर्घ कालावधीनंतरही जवळपास ७0 टक्के शेतकर्यांच्या विहिरीवर कृषीपंपाचे मीटर बसू शकले नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री विशेष कार्यक्रमातून जिल्ह्यातील १६५१ लाभार्थींची दीडवर्षांपूर्वीच जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत मोफत कृषीपंप जोडणीसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, वीज वितरण कंपनीच्या वाशिम यंत्रणेकडून अजूनही १३८८ लाभार्थींना कृषीपंप जोडणी दिली नसल्याची माहिती आहे. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींजवळ मोफत कृषीपंप जोडणी बसविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री सहायता योजनेतून कृषीपंप जोडणीची संकल्पना साकारली. या योजनेंतर्गत सुरूवातीला वाशिम जिल्ह्याला २३५ लाभार्थींचे उद्दिष्ट होते. मात्र, तत्कालिन कृषी सभापती रमेश शिंदे पाटील व कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून १६५१ लाभार्थींपर्यंत उद्दिष्ट वाढवून आणले. फेब्रुवारी २0१३ मध्ये कृषीपंप जोडणीसाठी लाभार्थींची यादी वाशिमच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आली. आतापर्यंत केवळ २६३ लाभार्थींना वीजजोडणी देण्यात आली. दीड वर्षात केवळ २६३ लाभार्थींना विद्युत जोडणी देऊन विज वितरण कंपनीने एकप्रकारे शेतकर्यांची क्रुर थट्टाच केली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आचारसंहिता शिथिल झाल्याने आणखी ४00 लाभार्थींंना कृषीपंप जोडणी देण्यात येणार होती. मात्र, त्याची कार्यवाही सुरू होणे बाकी आहे. थकित बिलापोटी वीजजोडणी कापणार्या वीज वितरण कंपनीने आपल्या कर्तव्यातही तेवढेच तत्पर असणे शेतकर्यांना अपेक्षीत आहे. कृषी विभागाने शुल्कापोटी लाखो रुपयांच्या भरणा वीज वितरण कंपनीच्या तिजोरीत केला आहे. असे असतानाही शेतकर्यांना कृषीपंप जोडणी मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. शेतकर्यांच्या किरकोळ प्रश्नांवरून रान उठविणार्या संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनीदेखील चुप्पी साधल्याने ह्यबेगडीपणह्ण चव्हाट्यावर आले आहे.
विद्युत वितरणाचा ‘शॉक’
By admin | Updated: May 11, 2014 22:03 IST