तेल्हारा : तेल्हारा तालुका हा बागायती क्षेत्रात मोडतो. तालुक्यातील अडगाव, बेलखेड, तळेगाव, माळेगाव, दानापूर परिसरात कांद्याचा भरपूर पेरा आहे; परंतु व्यापार्यांनी कांद्याचे भाव अचानक पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाळा जास्त झाल्याने शेतकर्यांचे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी हे खरीप पीक हातचे गेले. त्यानंतर शेतकर्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू व कांदा पिकांची लागवड केली. कांदा पिकाला प्रतिएकर जवळपास २० ते २५ हजार रुपयांचा खर्च आला. त्यात फेब्रुवारी महिन्यात गारपिटीचा तडाखा बसल्याने काही भागांमधील कांदा सडला. काही भागांमध्ये कांद्याचे उत्पादन चांगले होत आहे. व्यापार्यांनी शेतकर्यांकडून सुरुवातीला ७०० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी केली. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गत काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला. व्यापार्यांनी या संधीचा फायदा घेत कांद्याचे भाव अचानक पाडले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडद्वारे कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी गोपाल अग्रवाल, मनोज राऊ, प्रवीण खारोडे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकर्यांनी केली आहे.
व्यापार्यांनी पाडले कांद्याचे भाव
By admin | Updated: May 11, 2014 23:10 IST