(प्रतिनिधी) खामगाव: ह्यबाबाह्ण या शब्दाचा अर्थ कळायच्या आतच पितृक्षत्र हरविले. बालपणापासूनच आईचा हात धरूनच जगायला शिकले. आजही ती खंबीरपणे माझी पाठीराखी आहे. आई हेच आपले विश्व असून देवाने वडिलांना नेऊन आपल्यावर अन्याय करायला नको होता, असे शल्य कु. अलका राहाटोळे या तरुणीला आहे. शहरातील श्रीमती सत्यभामाबाई भिकाजी राहाटोळे यांच्या पतीचे सन १९९४ साली आजाराने निधन झाले. त्यांचे पती वारले त्यावेळी त्यांचा सर्वात लहान मुलगा अवघ्या ७ वर्षांचा होता. संसाराची गाडी रुळावर येण्याआधीच पतीच्या दुर्देवी आणि अकाली निधनामुळे सत्यभामाबाईंवर आभाळच कोसळले. मात्र, कुणीही सांभाळ करणारे नसल्याने त्यांना स्वत:लाच स्वत:चा आधार व्हावे लागले आणि आपल्या उण्या पंखांची छाया तीन लहान मुलांना द्यावी लागली. अपेडींक्सच्या आजाराच्या निदान न झाल्याने पती गेल्याचा विरह करण्याची संधीच त्यांना नियतिने दिली नाही. तीन चिमुकल्यांचा सांभाळ करण्यासोबतच स्वत:च्याही पोटाचा प्रश्न त्यांना सारखा भेडसावत होता. त्यामुळे पतीच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर एक लहानशी चहाटपरी थाटली. या टपरीच्या व्यवसायातून तिन्ही मुलांचे पालन पोषण आणि शिक्षण पूर्ण केले. मोठय़ा मुलीचा आणि मुलाचा विवाहही त्यांनी साध्या पद्धतीने पार पाडला आहे. त्यांच्या शारदा नामक मुलीचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून मुलगा पुरूषोत्तम आणि अलका या दोघांचेही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून पुरूषोत्तम हा आता आपल्या पायावर उभा आहे. त्याचप्रमाणे अलका देखील आईच्या चहा टपरीच्या व्यवसायात मदत करते. आईच्या व्यवसायात मदत करीत असताना जिल्हा होमगार्ड मध्ये ती सेवक म्हणून नियमित सेवा देते. आईनेच आपल्याला स्वत:च्या पायावर उभं राहण्याचे शिकविल्याचा अलकाला अभिमान आहे.
माझी आईच माझे विश्व !
By admin | Updated: May 10, 2014 23:26 IST