अकोला: दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठन करुन,कर्जदार सर्वच शेतकर्यांना येत्या खरीप हंगामात पीक कर्ज उपलब्ध करुन दिले पाहीजे, असा सूर गुरुवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. गेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पृष्ठभूमीवर गेल्या खरीप हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, येत्या खरीप हंगामात कर्जदार शेतकर्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे; परंतु, कर्जाची परतफेड न करणार्या शेतकर्यांचे पुनर्गठण करून, कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने यासंदर्भात लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. डी. गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रामदास मालवे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे प्रामुख्याने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत गेल्या वर्षी बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, कर्जदार शेतकर्यांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची बँकांसह शेतकर्यांना माहिती देण्यात आली पाहिजे तसेच राष्ट्रीयीकृत बँकांसह बहुतांश कर्जदार शेतकरी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून, सर्वच कर्जदार शेतकर्यांना पीक कर्जउपलब्ध व्हावे. यासाठी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत दिली पाहिजे. कर्जदार शेतकर्यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठण करून, सर्वच शेतकर्यांना कर्ज उपलब्ध झाल्यास, दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा मिळेल, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या चर्चेत उमटला. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी पुरेल असे वाढीव कर्ज उपलब्ध झाले पाहीजे, असा विचारही या चर्चेत मांडण्यात आला.
सर्वच कर्जदार शेतक-यांना कर्ज उपलब्ध करा!
By admin | Updated: April 24, 2015 02:08 IST