वाशिम : भारतीय जनता पक्षावर दबाव वाढविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून राज्यभरातील सर्व जिल्हा प्रमुखांना त्यांच्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाची माहिती घेऊन मुंबईला बोलवण्यात आले आहे. आगामी १९ सप्टेंबरला राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात महायुती अथवा स्वबळावर लढण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता राजकारणांकडुन व्यक्त केल्या जात आहे. आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीने सद्या राजकीय वातावरण तापविले आहे. सदर निवडणूकीत विजयाच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न चालविले आहेत. वाशिम जिल्ह्यात विधानसभेचे तिन मतदार संघ आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाइं, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीमध्ये अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षीत असलेल्या वाशिम सह रिसोड मतदारसंघ भाजपच्या तर कारंजा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. मात्र, सद्यस्थितीत जागा वाटपाच्या मुद्दावरून भाजपशी दुरावा वाढल्याने शिवसेनेने अधिक आक्रमक होत आपली शक्ती दाखवून देण्यासाठी पावले उचलणे सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये लढायचे अथवा स्वबळ आजमायचे यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाने राज्यभरातील जिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकार्यांना मुंबईला बोलाविले आहे. १९ ऑक्टोंबरला शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार असुन या बैठकीत महायुतीत लढायचे अथवा नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचाहीया बैठकीत अंदाज घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील इत्थंभूत माहिती पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वीच घेतली आहे. त्यात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार राहू शकतो याचाही समावेश आहे. त्यामुळे बैठकीत सेना नेतृत्व कोणता संदेश देतात याकडे लक्ष लागले आहे.
राज्यभरातील जिल्हाप्रमुखांना ‘सेना भवनातून’ निमंत्रण
By admin | Updated: September 18, 2014 01:12 IST