अकोला: विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रचारासाठी आयतीच संधी मिळाली. तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावणार्या इच्छुकांनी गणेश मंडळांवर लाखोंच्या देणग्यांची उधळण सुरू केली आहे. यातही सर्वाधिक जास्त रकमेची देणगी देण्यासाठी अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप व काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. निवडणूक कोणतीही असो, पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची ऊठबैस व धावपळीमुळे वातावरणात चैतन्य निर्माण करते. इच्छुक उमेदवारही या वेळी (फक्त निवडणुकीतच) कार्यकर्त्यांची मोठय़ा आस्थेने विचारपूस करतात आणि वेळोवेळी आर्थिक रसदही पुरवतात. विधानसभा निवडणुकीचे तिकीट आपल्याच पारड्यात पडणार, या अपेक्षेतून भाजपसह काँग्रेसचे इच्छुक उमेदवार गणेशभक्तांसाठी सरसावले आहेत. गणेश मंडळांसाठी चक्क लाखोंच्या देणग्यांचे वाटप केल्या जात आहे. देणगी वाटपाचा हा ह्यफिव्हरह्ण अकोला पूर्व मतदारसंघापेक्षा अकोला पश्चिम मतदारसंघात जास्त प्रमाणात असल्याची माहिती आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांना जोडण्यासाठी इच्छुक उमेदवार अक्षरश: पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. इच्छुकांचा हा फंडा कितपत यशस्वी ठरतो, याचे चित्र आगामी दिवसात लवकरच स्पष्ट होणार आहे. *पावत्यांचा हिशेब तपासणार कोण?इच्छुकांनी देणग्यांच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळण सुरू केली आहे. साहजिकच, गणेश मंडळांना दिलेल्या देणग्या व पावत्यांचा हिशेबही उमेदवारांनी ठेवणे गरजेचे आहे; परंतु हा खर्च तपासणार कोण, हा कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे.
इच्छुक उमेदवारांमध्ये रंगली स्पर्धा
By admin | Updated: September 4, 2014 01:28 IST