अकोला : जुन्या बस स्थानकाची जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी व्यापारी संकुल व शहर वाहतूक बस स्थानक निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर चर्चेत आलेल्या जुन्या बस स्थानकाच्या उत्पन्नवाढीकरिता एसटी महामंडळ सरसावले आहे. पूर्वी मध्यवर्ती बस स्थानकावरून सुटणार्या हैदराबाद, इंदूर, निजामाबाद या लांब पल्ल्यांच्या बसेस आता जुन्या बस स्थानकावरून सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १९७१ पासून लिज तत्त्वावर राज्य परिवहन महामंडळाकडे असलेली जुन्या बस स्थानकाची जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी व्यापारी संकुल व शहर बस वाहतूक बसस्थानक निर्माण करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या निर्णयानंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी महामंडळाने आधीच तोट्यात सुरू असलेल्या जुन्या बस स्थानकाच्या उत्पन्न वाढीकरिता पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. एसटी महामंडळाच्या सर्वच गाड्या पूर्वी जुन्या बस स्थानकावरून सुटत. मात्र, १९८0 मध्ये नव्या बस स्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बस स्थानकाला कमी महत्त्व दिले जाऊ लागले. राज्याच्या कानाकोपर्याचा दररोज ठाव घेणार्या सर्व गाड्या नवीन बस स्थानकाकडे वळत्या करण्यात आल्या. आजच्या घडीला जुन्या बस स्थानकावरून केवळ ग्रामीण भागात धावणार्या बसेस सुटतात. त्यातही ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांसह इतर सवलतीचा लाभ घेणार्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने बस स्थानकाच्या उत्पन्नात उत्तरोत्तर घट होत आली आहे. अडनरी म्हणून चालविल्या जाणार्या बहुतांश बसेस पासिंगदरम्यान डागडुजी करून परत रस्त्यावर उतरविल्या जातात. परिणामी जुन्या बस स्थानकावरून नादुरुस्त अवस्थेत धावणार्या भंगार गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढतच चालला आहे. या सर्व बाबींवर मात करण्याच्या उद्देशाने नवीन बस स्थानकाकडे असलेल्या काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे शेड्युल जुन्या बस स्थानकाकडे सोपविण्याचा निर्णय अकोला विभाग नियंत्रकांनी घेतला आहे. प्राथमिक तत्त्वावर हैदराबाद, इंदूर व निजामाबाद या गाड्यांचे वेळापत्रक जुन्या बस स्थानकाकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी नवीन बस स्थानकावरून सुटणारी अकोला-हैदराबाद ही बस दररोज सकाळी ६ वाजता, अकोला-इंदूर सकाळी ६ वाजता तर अकोला-निजामाबाद सकाळी १0 वाजता जुन्या बस स्थानकावरून सोडण्यात येणार आहे. या नवीन बदलामुळे भविष्यात जुन्या बस स्थानकाच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल, असा विश्वास अकोला विभाग नियंत्रकांनी व्यक्त केला आहे.
हैदराबाद, इंदूर, निजामाबाद बससेवा जुन्या बस स्थानकावरून
By admin | Updated: August 5, 2014 01:01 IST