मूर्तिजापूर: पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात हाहाकार माजला असतानाच वन्यप्राण्यांमुळे बागायती शेतीही संकटात आली आहे. तालुक्यातील आमतवाडा येथील एक ा शेतकर्याची चार एकरातील पर्हाटी वन्यप्राण्यांनी फस्त केल्यामुळे या शेतकर्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तथापि, सिंचनाची व्यवस्था असणार्या शेतकर्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे; परंतु वन्यप्राणी या पिकाचा पूर्णपणे सत्यानाश करीत आहेत. हरीण, रानडुक्कर, माकडे आदी प्राण्यांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. याचा फटका आमतवाडा येथील प्रशांत शेषराव वहिले या शेतकर्याला बसला असून, त्यांनी चार एकर क्षेत्रात लागवड केलेली मान्सूनपूर्व संपूर्ण कपाशी हरिणांनी फस्त केली आहे. वहिले यांनी सहा हजार रुपये किमतीचे बियाणे आणले. त्याशिवाय लागवड, खते आणि सिंचनासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला; परंतु वन्यप्राण्यांनी ती कपाशी पूर्णपणे नष्ट केल्याने या शेतकर्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे शेतकरी जीवावर उदार होऊन पिकांच्या रक्षणासाठी शेतात रात्रभर जागरण करीत आहेत. वनविभागाने शेतकर्यांची स्थिती लक्षात घेऊन वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आर्जव शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे बागायती शेती संकटात
By admin | Updated: July 8, 2014 21:51 IST