अकोला : मोबाईल कंपन्यांच्यावतीने होणारे खोदकाम बंद करण्याचा ठराव मनपाच्या सभागृहाने पारित केल्यावरदेखील फोर-जी सुविधेसाठी खोदकाम करणार्या मोबाईल कंपनीच्या कर्मचार्यांना पिटाळून लावण्यात आल्याची घटना मंगळवारी जुने शहरातील जय हिंद चौकात घडली. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या साहित्याला सील लावले.फोर-जी सुविधा उपलब्ध करण्याच्या नावाखाली शहरात खोदकाम करणार्या मोबाईल कंपन्या मनमानी करीत आहेत. कंपनीकडून खोदकाम होत असताना सिमेंट काँक्रिट रस्त्यासह जलवाहिन्यांची प्रचंड तोडफोड होत असल्याने कंपनीचे काम बंद करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत २१ ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. या ठरावाकडे प्रशासनाने कानाडोळा करीत मोबाईल कंपन्यांना शहरात खोदकामाची सूट दिल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी सिमेंट रस्त्यांसह जलवाहिन्यांची तोडफोड केल्या जात आहे. भाजप, शिवसेना नगरसेवकांच्या सूचनेवरून तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी काम बंद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्यावरही मोबाईल कंपन्यांची मनमानी सुरूच आहे. हा प्रकार मंगळवारी जय हिंद चौकात मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सुधिर काहाकार यांच्या लक्षात आला. यावेळी कंपनीच्या कर्मचार्यांना हटकले असता, त्यांनी अरेरावी केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कं पनीच्या कर्मचार्यांना अक्षरश: पिटाळून लावले. कंपनीच्या विरोधात सुधिर काहाकार यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या खोदकामाच्या मशीनला सील लावले.
कर्मचा-यांना पिटाळले; फोर-जीचे खोदकाम केले बंद
By admin | Updated: October 1, 2014 01:26 IST