अकोला: शिक्षक दिनी प्रसारित होणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा संदेश राहणार आहे. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सुविधा जिल्हय़ातील ४0 टक्के शाळांमध्ये नसल्याने, शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे. जिल्हय़ात जवळपास १ हजार ५६४ शाळा असून, यामध्ये सुमारे ३ लाख ३३ हजार १२५ विद्यार्थी आहेत. त्यापैकी एक हजारावर शाळांना गत काही वर्षांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाद्वारे टीव्ही संच पुरविण्यात आले होते; मात्र आजही तब्बल ४0 टक्के शाळांमध्ये टीव्ही संच उपलब्ध नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी दिली. तीन लाख विद्यार्थ्यांपैकी दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांंना भाषण ऐकविण्याची सुविधा असून, उर्वरित जवळपास एक लाख विद्यार्थ्यांच्या कानावर पंतप्रधानांचे शब्द पडावेत, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे.प्रत्येक शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी शिक्षक दिनी दुपारी २.३0 ते ते ४.४५ यावेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे. पंतप्रधानांचे विचार देशातील प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकापर्यंंत पोहोचावे, अशी केंद्र सरकारची मनिषा आहे. प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये आवश्यक सुविधाच नसल्याने केंद्र सरकारची इच्छा पूर्ण करावी तरी कशी, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.
मोदींच्या संदेशासाठी शिक्षण विभागाची ‘कवायत’
By admin | Updated: September 2, 2014 20:35 IST