अकोला : पावसाच्या पुनरागमणामुळे वर्हाडातील धरणांचा जलसाठा वाढण्यास सुरूवात झाली असून, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यतील काही धरणांमध्ये सत्तर ते शंभर टक्के जलसाठा संचयित झाला आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणाची पातळी अद्याप जैसे थे असल्याने या जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाळ्य़ाच्या शेवटच्या महिन्यात पावसाचे पुनरागमण झाले असल्याने शेतकरी, नागरिकांनी सुटकेचा निश्वास टकाला आहे. या पावसामुळे अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व यवतमाळ या जिल्हय़ातील धरणांच्या जलसाठय़ात वाढ होत असून, यवतमाळ जिल्हयातील सायखेडा या धरण शंभर टक्के पाण्याने भरले आहे. याच जिल्हयातील बोरगाव या धरणाचा जलसाठा ९१ टक्के, लोअरपूर ७६ टक्के, वाघाडी ७२ टक्के, गोकी ७२ टक्के तर पूस धरणातील जलसाठा ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्हयातील मस या धरणात ७७ टक्के आणि कोराडीमध्ये ७८ टक्के वाढ झाली असून , पलढग ५४ टक्के, नळगंगा ३८ टक्के तर ज्ञानगंगा प्रकल्पात ४९ टक्के जलसाठा वाढला आहे. अकोला जिल्हयातील धरणांच्या जलपातळीत अद्याप अपेक्षित वाढ झाली नसल्याने या जिल्हयाला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. अकोला जिल्हयात काटेपूर्णा हे मोठे धरण आहे. या धरणातून अकोला, मूर्तीजापूर शहर , साठ खेडे पाणीपुरवठा योजना व अकोला औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो; तथापि या धरणात आजमितीस केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे इतर जिल्हयातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत असताना काटेपूर्णा धरणांच्या पातळीत मात्र घसरण होत आहे. याच जिल्हयातील मोर्णा, निगरुणा व उमा या मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ३७, ४६ व १५ टक्के एवढी अल्पशी वाढ झाली आहे. पोपटखेड या लघू प्रकल्पात ९१ टक्के जलसासाठा असून, अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्हयाच्या सिमेवर असलेल्या वाण या सिंचन प्रकल्पात ८५ टक्के जलसाठा आहे.
** दगडपारवातील जलसाठा शून्यावरच
अकोला पूर संरक्षण योजनेतंर्गत बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे धरण बांधण्यात आले आहे. पूरक पाऊस नसल्याने या धरणाचा जलसाठा शून्यावर आहे.