सिंदखेडराजा : तालुक्यात सर्वात मोठे शहर वजा गाव असलेले साखरखेर्डा हे आडवळणी असून, येथे २0 हजार लोकसंख्या आहे. मेहकर, चिखली, खामगाव आगाराने नियमीत चालणार्या बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तोकड्या बस सेवेमुळे हजारो प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. सिंदखेडराजा पासून ६0 किमी, चिखलीपासून ३५ किमी आणि मेहकरपासून २२ किमी अंतरावर साखरखेर्डा गाव आहे. पलसिद्ध महास्वामी यांचा १ वर्षापूर्वीचा मठ आणि प.पू.प्रल्हाद महाराज (रामदासी) यांचे संस्थान यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून या नगरीत भाविक येत असतात. २५ एप्रिल ते ५ मे या ११ दिवसांच्या कालावधीत सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांचा अमृत महोत्सव आणि नविन मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे. या महोत्सवात किमान ५0 हजाराहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. येणार्या भाविकांना चिखली,मेहकर, खामगाव, जालना पर्यंत येणे सोपे होते. परंतु तेथून साखरखेर्डा जाणे बस नसल्यामुळे अवघड झाले होते. मेरा चौकी, लव्हाळा चौकी आणि दुसरबीड येथे येवून साखरखेर्डा जाणारे ऑटो, काळीपिवळी यासारखे खासगी वाहने शोधावी लागतात. तीही खचाखच भरल्यानंतरच पुढील प्रवासाला निघते, त्यातही दुप्पट भाडे असा हा जीवघेणा प्रवास साखरखेर्डा येथे येणार्या प्रवाशांना करावा लागतो. मेहकर आगाराने तर नियमीत चालणारी आणि नियमापेक्षा अधिक उत्पन्न देणारी साखरखेर्डा, जालना व परत जालना, साखरखेर्डा, सवडद मुक्कामी जाणारी बस १५ दिवसांपासून बंद आहे. याबरोबरच अनेक बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यात काही बसेसचे टायर बसणे, नळी लिकेज होणे हा नित्याचा क्रम झाला आहे. यावर मात्र लोकप्रतिनिधीसह संबंधितांचेही साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. चिखली आगाराकडे चिखली-लोणार, चिखली-मेहकर, चिखली-वाशिम ह्या बंद केलेल्या बसेस सुरु करण्याची वारंवार मागणी करुनही बसेस सुरु करण्यात नाहीत. खामगाव आगाराचे आगारप्रमुख यांनी साखरखेर्डा मार्गावरुन अकोला- किनगावजट्ट, खामगाव-लोणार, खामगाव-जालना ह्या तीन बसेस धावतात. त्यात खामगाव ते जालना या बसमध्ये नियमापेक्षा दुप्पट प्रवाशी वाहतूक होते. साखरखेर्डा येथून बसणार्या प्रवाशांना बसमध्ये जागा मिळत नाही. ८५ किमी उभे राहून त्यांना प्रवास करावा लागतो. खामगाव ते जालना-औरंगाबाद ही पुन्हा एक बस सुरु करावी. तसेच खामगाव ते शेंदुर्जन ही बंद केलेली बस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी जोर धरत असून, तेथे आमदाराचे पत्र मागितले जाते. प्रवाशांना भर उन्हाळ्यात कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी लागते. तेव्हा बंद केलेल्या बसेस तात्काळ पुर्ववत सुरु कराव्या, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
बंद बसेसमुळे हाल
By admin | Updated: May 10, 2014 23:44 IST