अकोला: स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील ओल्या कचर्याची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावून ओल्या कचर्यातून गॅसनिर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेत गुरुवारी बायोगॅस प्रकल्पाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महापौर उज्ज्वला देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर विनोद मापारी, सभागृह नेते योगेश गोतमारे, नगरसेविका उषा विरक, नगरसेवक गजानन गवई, सतीश ढगे, बाळ टाले, आशिष पवित्रकार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा. यशवंत जयसिंगपुरे, प्रा. ज्योती रवाळे यांची उपस्थिती होती. यावेळी अशोक तोष्णीवाल व त्यांच्या चमुने कार्यशाळेत प्रात्यक्षिक बायोगॅसचा प्रकल्प सुरू करून गॅसची निर्मिती करून दाखविली. त्यांनी सांगितले की, ओला कचरा, भाजीपाल्याचा कचरा, शिळी पोळी, खराब झालेले फळे, भाज्या, निर्माल्य, कापड आणि भांडे धुतलेले पाणी आदी साहित्यापासून बायोगॅस निर्माण होतो. यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात लागणार्या गॅसमध्ये ४0 ते ५0 टक्के गॅसची बचत होवू शकते. चार ते सदस्यांसाठी एक हजार लीटरचा बायोगॅस प्रकल्प आवश्यक असून, त्याची किंमत २0 हजार रुपये आहे. सदर प्रकल्प १५ ते २0 वर्षांपर्यंत चालू शकतो. २.५ किलो ओल्या कचर्यातून या प्रकल्पात एक तास न थांबता गॅस निर्मिती होते. बायोगॅसची कोणत्याही प्रकारे दुर्गंंधी येत नाही. यावेळी प्राचार्य सुभाष भडांगे म्हणाले, की वसुंधरा दिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा न जाळण्याची आम्ही शपथ घेतली आहे. श्री शिवाजी महाविद्यालयात तोष्णीवाल यांचा बायोगॅस प्रकल्प राबवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ओल्या कच-यापासून बायोगॅस निर्मितीचे प्रात्यक्षिक
By admin | Updated: April 24, 2015 02:08 IST