अकोला : लाचखोर प्रकरणात मंगळवारी गजाआड केलेल्या तलाठ्याला १५ मेपर्यंत पोलिस कोठडी तर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकाला जामीन मिळाला आहे. विम्याचे पैसे व शेतीची हक्क नोंदणी करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणारा तलाठी दर्शन चव्हाण सोमवारी उशिरा रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याच दिवशी व्यवसायासाठी दाखल केलेल्या कर्जाच्या १२0 फाईल मंजूर करण्यासाठी १ लाख ९५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रकाश पांडुरंग डांगे (अमरावती) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. १ लाख ९५ हजार रुपयांची एवढी मोठी रक्कम खासगी सचिव धनवंत आठवले याच्या माध्यमातून स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी विभागीय व्यवस्थापक प्रकाश डांगे यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती; परंतु न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नंतर त्यांना एक दिवसाआड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
तलाठ्याला कोठडी तर व्यवस्थापकाला जामीन
By admin | Updated: May 14, 2014 23:17 IST