कोरोनाच्या संकटात कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला. टप्प्याटप्प्याने प्रत्येक घटकातील व्यक्तींना लस दिली जाऊ लागली. लसीकरणाच्या यादीत आपलेही नाव येईल, या आशेने १८ वर्षापुढील युवक लसीच्या प्रतीक्षेत होते. केंद्र शासनाने सोमवारी मोठी घोषणा करत १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांनाच लस दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तरुणाईची प्रतीक्षा संपली, मात्र ही मोहीम आरोग्य विभागासाठी मोठी आव्हानात्मक राहणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५ वर्ष वयोगटावरील सुमारे ४० टक्के कोविड लसीकरण झाले असून उर्वरीत ६० टक्के लसीकरण आणखी व्हायचे आहे. तसेच गरजेनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीची टंचाई जाणवते, अशातच १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाल्यास आरोग्य विभागाची मोठी पंचाईत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एक आठवड्याचा साठा
जिल्ह्यात गरजेनुसार कोविड लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकदा लसीची टंचाई जाणवते. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे १६५०० डोस उपलब्ध झाले होते. दिवसाला सुमारे ५ हजार लाभार्थींना लस दिली जाते. त्यामुळे उपलब्ध साठा हा जेमतेम आठवडाभर पुरेल येवढाच शिल्लक असल्याचे निदर्शनास येते.
अनेकदा दोन पैकी एका लसीचाच साठा शिल्लक असल्याने केवळ एकाच लसीचा पहिला व दुसरा डोस दिल्या जातो. त्याचाही प्रभाव लसीकरण मोहीमेवर पडतो.
जेष्ठही मागेच
जिल्ह्यात ६० वर्षावरील व्यक्तींना कोविड लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर चांगला उत्साह दिसून आला. कोविड लसीकरणाचा वेगही झपाट्याने वाढू लागला होता. पहिला डोस घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती, मात्र काही दिवसंत ज्येष्ठांच्या लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्र दिसू लागले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लसीचा तुटवडा या कारणांमुळे बहुतांश वयोवृद्ध घराबाहेर पडण्यास टाळत आहेत. त्याचा परिणाम लसीकरणावरही झाल्याचे दिसून येत आहे.
४५ पेक्षा जास्त वयाचे ४० टक्केच लसीकरण जिल्ह्यात ४५ पक्ष जास्त वयोगटातील व्यक्तींमध्ये लसीकरणाचा उत्साह कायम आहे, मात्र लसीची टंचाईमुळे लसीकरणाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. अनेकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
लसीचा तुटवड्यामुळे कोविड लसीकरणाचा वेग मंदावल्याने या गटातील लसीकरण सुमारे ४० टक्के झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.
दुसऱ्या डोसचे काय?
जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा मर्यादित पुरवठा करण्यात येतो. त्या तुलनेत लाभार्थींची संख्या जास्त आहे.
अनेकदा दोन पैकी एका लसीचे डोस संपल्याने दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागते.
पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या जास्त आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना लस उपलब्ध होत नाही.
शासनामार्फत गरजेनुसार लसीचा पुरवठा झाल्यास पहिल्या डोस सोबतच लाभार्थींना दुसरा डोसही सहज उपलब्ध होऊ शकेल.
मार्गदर्शक सुचनांची प्रतीक्षा
कोविड लसीकरण मोहीमेंतर्गत १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना कोविड लस दिली जाणार असल्याचे शासनाने म्हटले आहे, परंतु त्या संदर्भात आवश्यक मार्गदर्शक सुचना अद्यापही आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून जिल्हास्तरावर कुठलेही नियोजन झाले नाही. गरजेनुसार लसीकरण केंद्र वाढविण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.