कर्जत : नव्या चेक पोस्टमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना ऊन, वारा, पावसातही काम करणे सोयीचे होणार आहे. कोणावरही अन्याय, अत्याचार झाला तर केवळ फिर्याद द्यावी. पुढची सर्व जबाबदारी पोलीस पार पाडतील, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
राज्य सरकारच्या सीएसआर फंडातून कर्जत येथे उपलब्ध केलेल्या चेकपोस्ट अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार रोहित पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तहसीलदार नानासाहेब आगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, डॉ. शबनम इनामदार, भास्कर भैलुमे आदी उपस्थित होते.
सध्या चार चेकपोस्ट देण्यात आले असून आणखी चार लहान अशा एकूण आठ पोलीस चौक्यांचा यामध्ये सामावेश आहे. संबंधित भागासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची असलेली आवश्यकता, नागरिकांच्या अडचणी, अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘भरोसा सेलमुळे’ पीडितांना न्याय मिळत आहे.
---
मिरजगाव, खर्डा पोलीस ठाण्यांना मंजुरी
कर्जत व जामखेड शहराच्या रक्षणासाठी सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पातून अंदाजे ४९ स्थळांवर १२० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष राहणार आहे. कर्जत-जामखेडची पोलीस यंत्रणा अधिक वेगवान होण्यासाठी गस्तीसाठी पोलिसांना चारचाकी दोन वाहने व चार दुचाकी वाहने देण्यात आली आहेत. मिरजगाव व खर्डा या ठिकाणीही नव्याने पोलीस ठाण्याची मंजुरी मिळाली आहे. ७४ निवासस्थानांची अद्ययावत पोलीस वसाहत मंजूर झाली आहे.
---
१९ कर्जत
कर्जत-जामखेड तालुक्यांसाठी आलेल्या पोलीस चौकीचे अनावरण करताना आमदार रोहित पवार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील समवेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, संभाजी गायकवाड व कर्मचारी. कृपया फोटोसह बातमी अपेक्षित आहे.