अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केली होती़ विधानसभेतही आघाडी कायम ठेवणार असून, २४ जागांची मागणी केली आहे़ मात्र, ११ जागांसाठी आग्रही राहणार आहे़ शेवटी पाच जागांवर तडजोड करण्याची वेळ आली तरी निवडणूक काँग्रेससोबतच लढणार, अशी भूमिका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा़ जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली़ कवाडे पुढे म्हणाले की, विधानसभेसाठी काँग्रेसकडे श्रीरामपुरच्या जागेची मागणी केली असून, ही जागा आम्हालाच मिळणार आहे़ काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपांचा तिढा सुटल्यानंतर आमची बैठक होणार आहे़ पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याने त्यांच्या कोट्यातूनही आम्हाला जागा देण्यात याव्यात़ राज्यात मागासवर्गीयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ मागासवर्गीयांच्या सहकारी औद्योगिक संस्थांना कर्ज देतानी अनेक अडचणी आणल्या जातात़ याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मांडला असल्याचे कवाडे म्हणाले़ दलित अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत़ राज्य शासनाने या घटनांना पायबंद घालण्यासाठी कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे़ अॅट्रोसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही़ अन्याय होवूनही अनेक ठिकाणी दलितांवरच क्रॉस केसेस दाखल केल्या जातात़ प्रशासनातील अधिकारी शासनालाही जुमानत नाहीत़ त्यासाठी ज्यांच्या हद्दीत अत्याचाराच्या घटना घडतात तेथील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांस जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे कवाडे म्हणाले़ सरकार कुणाचेही असले तरी गावगाड्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीत़ केवळ लोकशाहीच्या जतनासाठी आम्ही काँग्रेससोबत राहण्याची भूमिका घेतली आहे़ (प्रतिनिधी)
काँग्रेससोबतच राहणार
By admin | Updated: August 24, 2014 02:09 IST