वन्यजीव विभागाच्या कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात व वनविभागाच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारचे वन्यप्राणी आणि पशुपक्षी वास्तव्यास आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वनविभागामार्फत परिसरातील वन्यप्राणी आणि पशुपक्षी यांची मोजदाद केली जात असते. यासाठी वनविभाग तज्ज्ञ निरीक्षकांची नेमणूक करीत असते. त्यांच्या जोडीला वनविभागाचे कर्मचारीही असतात. यासाठी वेगवेगळ्या पाणवठ्यावर तसेच नदी किनाऱ्यावर असलेल्या झाडावर माच तयार करून रात्रीच्या वेळी वन कर्मचारी आपल्या तज्ज्ञ निरीक्षकासह यावर बसून राहतात. पाणी पिण्यासाठी या पाणवठ्यावर वन्यप्राणी येत असतात. यावेळी हे निरीक्षक त्याची नोंद करीत असतात. त्याचबरोबर पायाचे ठसे यावरूनही संख्या मोजली जाते.
वनपरिक्षेत्रात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, बिबटे, रानडुक्कर, गवा, कोल्हे, लांडगे, आदी वन्यप्राणी व उंच झाडावर वास्तव्यास असणारे शेकरू, आदींची संख्या बुद्ध पौर्णिमेला मोजत असतात.
यावरून वनविभाग आपल्या हद्दीत किती वन्यप्राणी, कोणत्या प्रकारचे पशुपक्षी आहेत हे जाहीर करीत असतात.
मात्र, मागील वर्षीही बुद्ध पौर्णिमेच्या वेळी पहिल्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होता. त्यामुळे वन्यप्राणी आणि पशुपक्षी यांची शिरगणती होऊ शकली नव्हती. याही वर्षी कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने बुधवारी असणाऱ्या पौर्णिमेला ही मोजदाद करण्यास वन्यजीव विभागाने स्थगिती दिली आहे.