मुळा धरणातील १५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर दररोज पिण्यासाठी व उद्योगधंद्यासाठी होत आहे. याशिवाय ४ दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. जायकवाडीकडे पंधरा हजार दशलक्ष घनफूट वाहून गेले आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अजूनही मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून कोणीही पाण्याची मागणी केलेली नाही. पुढील महिनाभर कोणीही पाण्याची मागणी करण्याची शक्यता नाही. यंदा मुबलक प्रमाणात शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. मुळा धरणातून जायकवाडीला पाणी गेले आहे.
पाटबंधारे खात्याने चाऱ्यांची दुरुस्ती सध्या करणे गरजेचे आहे. दरवर्षी १५ ऑक्टोबरला मुळा धरणाचे पाणी वाटप धोरण जाहीर होते; परंतु गेल्या काही वर्षांपासून कालवा पाणी वाटप समितीची बैठक वेळेवर होत नाही. पाण्याची मागणी नसल्यामुळे अजून कालवा समितीची बैठक झालेली नाही.
कोट-
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा स्थिर आहे. पुढील आठवड्यात पाण्याची पातळी हळूहळू कमी होईल. काही प्रमाणात उद्योगधंदे आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर होत आहे. यंदा मुबलक प्रमाणात दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
- अण्णासाहेब आंधळे,
मुळा धरण, शाखा अभियंता