अहमदनगर : देवस्थानच्या विश्वस्तांनी चौथरा प्रवेशासाठी खुला केला असला तरी ग्रामस्थ व महिला विरोध करतील अशी चर्चा होती. मात्र, ग्रामस्थांनीही हा निर्णय स्वीकारात महिलांना चौथऱ्यावर जाऊ दिले. भूमाताच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सायंकाळी सातच्या सुमारास आरती संपल्यानंतर चौथऱ्यावर प्रवेश केला. पुरुष कावडीधारकांनी देवस्थानचा आदेश झुगारत चौथऱ्यावर जात साडेअकराच्या सुमारास शनिच्या शिळेला जलाभिषेक केला. त्यामुळे देवस्थान विश्वस्तांनी तातडीने बैठक घेत न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत महिलांनाही प्रवेश खुला करण्याचा निर्णय घेतला. शिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त शालिनी लांडे यांनी दुपारी दीडच्या सुमारास पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे स्वागत करत देसाई तातडीने पुण्याहून शिंगणापुरात दर्शनासाठी आल्या. देसाई पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यापासून दुरावलेल्या भूमाताच्या दुसऱ्या गटातील केवडेकर,जगताप व दुर्गा शुक्रे यांनी चौथऱ्यावर जात दर्शन घेतले होते. सायंकाळी देसाई यांनी दर्शन घेतल्यानंतर त्या शिंगणापूरात न थांबता लगेचच पुण्याकडे रवाना झाल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. सुरक्षारक्षक महिलांनारडू कोसळलेशनिच्या शिळेचे रक्षण करण्यासाठी दिवसभर खडा पहारा देणाऱ्या पाच ते सहा महिला सुरक्षारक्षकांना या घटनेने मोठा हादरा बसला़ गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यात तेल ओतून शनिची सेवा केली़ यापूर्वी कधीही असे घडले नाही़ मात्र, आज महिला थेट चौथऱ्यावर जात असल्याचे पाहून या सुरक्षारक्षकांना अश्रू आवरता आले नाहीत़ शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले जात नव्हते़ यापूर्वी कधीही चौथरा चढले नाही़ यापुढेही चौथऱ्यावर चढणार नाही़-नंदा सोनवणे, घोडेगावशनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय चुकीचा आहे़ आम्ही कधीही चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार नाही़ शनी देवाला महिलांचा स्पर्श झाला नाही पाहिजे़ हा निर्णय चुकीचा आहे़-मनिषा खंडागळे, लोहगावआम्ही अनेक वर्षांपासून येथे राहतो़ यापूर्वी चौथऱ्यावर जाऊन महिलांनी कधीही शनिचे दर्शन घेतले नाही आणि घेऊही नये़ शनिला महिलांची सावलीही चालत नाही, परंतु हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे़ -येणुबाई दहिफळे, सोनईमी गेल्या दहा वर्षांपासून नियमित दर्शनासाठी येते़ महिलांनी चौथऱ्यावर न जाता दर्शन घेणेच योग्य होते़ चौथऱ्यावर मारुती आहे़ शनिच्या शिळेवर महिलांची सावली पडू देऊ नये, ही आपली परंपरा आहे़-कलप्पा अलोरे, भाविक, कर्नाटकआंदोलनाचा घटनाक्रम२८ नोव्हेंबर : पुण्यातील एका तरुणीने सुरक्षारक्षकांचे कडे भेदून चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेल वाहिले२९ नोव्हेंबर : तरुणीने थेट शनी चौथऱ्यावर प्रवेश केल्यामुळे ट्रस्टने चौथऱ्याचा दुग्धाभिषेक केला. त्यामुळे राज्यभर देवस्थानच्या भूमिकेविरोधात जनक्षोभ भडकला़२० डिसेंबर : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, दुर्गा शुक्रे, पुष्पक केवडेकर, प्रियंका जगताप यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट शिंगणापूर गाठले़ शनी चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले.२१ डिसेंबर : प्रजासत्ताकदिनी शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदर्शन घेणारच, अशी जाहीर घोषणा ‘भूमाता’ने केली़ १२ जानेवारी : हिंदू जनजागृती समितीने ‘भूमाता’विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व त्यांना अटकाव करण्याची मागणी केली़ २१ जानेवारी : भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी शनी चौथऱ्यावर जाऊ नये, असा आदेश पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी काढला़ तसेच देवस्थानशी चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना केली.२२ जानेवारी : भूमाता ब्रिगेडच्या महिलांना शिंगणापूरला जाण्यापासून अडविण्यासाठी शिवसेना महिला आघाडीही सरसावली़ २६ जानेवारी : ठरल्याप्रमाणे भूमाता ब्रिगेड शिंगणापूरला निघाली. मात्र, त्यांना नगरजवळील सुपा येथे पोलिसांनी अडविले़ २६ जानेवारी : महिलांना शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा, असे टिष्ट्वट मुख्यमंत्र्यांनी केले. ६ फेब्रुवारी : जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थान, भूमाता, देवस्थान बचाव समिती यांची एकत्रित बैठक घेतली. ७ फेबु्रवारी : शनी चौथऱ्याच्या प्रवेशावरून पेटलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी पुण्यात भूमाता ब्रिगेड, शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट, शनैश्वर देवस्थान बचाव समिती यांची संयुक्त बैठक घेतली़ तीन फुटांवरुन महिलांना दर्शन दिले जावे, हा तोडगा त्यांनी सुचविला. १२ फेब्रुवारी : नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यांनीच तोडगा काढण्याची गळ घातली़ २२ फेबु्रवारी : तृप्ती देसाई, माधुरी शिंदे, मीना भटकर, मनीषा टिळेकर, शहनाज शेख, आशाताई गाडीवडार, मंगल पाटे यांनी पुन्हा शिंगणापुरात जाण्याचा प्रयत्न केला. १९ मार्च : सायंकाळी चार वाजता तृप्ती देसाई काही महिलांसोबत अचानक शनिशिंगणापुरात अवतरल्या़ पोलिसांनी त्यांना चौथऱ्याकडे जाण्यापासून रोखले.३० मार्च : अॅड़ नीलिमा वर्तक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ़ विद्या बाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन पुरुषांना प्रवेश असलेल्या मंदिरांत महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.२ एप्रिल : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तृप्ती देसाई शिंगणापुरात आल्या़ मात्र, ग्रामस्थ व पोलिसांनी त्यांना चौथऱ्यावर जाऊ दिले नाही़ ८ एप्रिल : कावडीधारकांचा चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक. त्यानंतर महिलांनाही प्रवेश देण्याची देवस्थानची घोषणा. सकाळी जलाभिषेकप्रसंगी रुढी-परंपरा पाळण्यास देवस्थान ट्रस्टने विरोध केला़ त्यामुळे संतापलेल्या भाविक व ग्रामस्थांनी थेट चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक केला़ त्यामुळे देवस्थानने घाईने महिलांसाठी चौथरा खुला करण्याचा निर्णय घेतला़ देवस्थानचा निर्णय शिंगणापूर ग्रामस्थ व परिसरातील गावांमधील भाविकांना कितपत पटतो, हे काळ ठरवेल़- संभाजी दहातोंडे, अध्यक्ष, शनैश्वर बचाव कृती समितीअंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९९८ सालीच हा लढा सुरू केला होता़ शनी चौथरा प्रवेशासाठी नरेंद्र दाभोलकर, डॉ़ श्रीराम लागू यांना २००० साली अटक झाली होती़ २००१ मध्ये डॉ़ दाभोलकरांनी महालक्ष्मी व शिंगणापूर देवस्थानांबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे़ -अॅड़ रंजना गवांदे, कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समितीविश्वस्तांनी ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला हवे होते़ पण त्यांनी हा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला. शनीमूर्तीला कावडीतून आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्याची परंपरा आहे़ ही परंपरा पाळण्यासाठी ग्रामस्थांनी आग्रह धरला म्हणून विश्वस्तांनी ग्रामस्थांच्या पाठीतच खंजीर खुपसला, हे चुकीचे आहे़ - आ. बाळासाहेब मुरकुटे, नेवासा शिंगणापूरमध्ये स्त्री-पुरुष समतेसाठी अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याला यश आले आहे. आतातरी धर्मांध प्रवृत्तींनी जनतेला अशा भेदभावात गुरफटून ठेवू नये़-बाबा अरगडे, शनी शिंगणापूर समतेच्या लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते ‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागत : महिलांना चौथऱ्यावर प्रवेश देता येत नाही म्हणून कावडीधारकांना प्रवेश देण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय शिंगणापूर देवस्थानने घेतला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ‘कावडीची परंपरा मोडता, मग महिला प्रवेशाची का नाही?’ असा सवाल देवस्थान ट्रस्टला केला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवस्थानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी लक्ष घालून समतेची गुढी उभारावी, असे आवाहन केले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातून स्वागत झाले.
तृप्ती देसाई निर्विघ्नपणे चौथऱ्यावर
By admin | Updated: April 9, 2016 00:31 IST