लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून बाजारपेठेतील व्यवहार ठप्प आहेत. हातावर पोट असलेल्या मजुरांचा रोजगार बुडाला; पण हाताला काम नसेल तर काय खायचे, अशी चिंता सतावू लागलेली. अशा वेळी लॉकडाऊन काळात राहाता तालुक्यातील मजुरांना घरबसल्या चिंचा फोडण्याचा नवीन रोजगार उपलब्ध झाला आहे. तोच आता त्यांच्यासाठी आधार ठरला आहे. यातून शेकडो कुटुंबे उदरनिर्वाह भागवीत आहेत.
गतवर्षी कोरोना संसर्गामुळे तब्बल नऊ महिने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजुरांचे बाजारपेठेतील व्यवहार बंद असल्याने आर्थिक संकटाशी सामना करावा लागला. आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कडक निर्बंध लादले गेल्याने गेल्या महिनाभरापासून बाजारपेठेतील व्यवहार बंद आहेत. त्यामुळे कष्टकरी मजुरांचा रोजगार बुडाला.
अशात चिंचा फोडण्याचा नवाच रोजगार मिळाला आहे. राहाता तालुक्यातील जवळपास सर्वंच गावांमध्ये आणि संगमनेर तालुक्यातील कुरण, समनापूर जोर्वे, आश्वी, दाढ खुर्द, चणेगाव, लोहारे, कासारे या भागांतील शेकडो कुटुंबांना कोरोनामध्ये घरबसल्या सुरक्षित रोजगार उपलब्ध झाला आहे.
............
परराज्यात होते निर्यात......
ऐन उन्हाळ्यात चिंचा काढणीला येतात व त्या चिंचा फोडून चिंचा व चिंचोके वेगळे करून ते व्यापाऱ्यांमार्फत आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू या राज्यांत पाठविल्या जातात. राहाता, संगमनेर तालुक्यात या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होत असून, एक कुटुंब दिवसाला सहाशे ते आठशे रुपये कमाई करते. स्थानिक व्यापारी एका किलोला २० रुपये मजुरी देऊन चिंचा फोडून घेतात. या नवीन रोजगारात प्रामुख्याने महिला मजुरांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
...................
कोरोनामुळे बाजारपेठेतील व्यवहार बंद झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. चिंचा फोडण्याचा चांगला रोजगार घरबसल्या मिळाल्याने कुटुंबात राहून काम करण्याचा आनंद वेगळाच व चार पैसे मिळत असल्याने कोरोनाकाळात उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे.
- लियाकत तांडेल,
चिंचा फोडणारे मजूर, कोल्हार, ता.राहाता
.....................
हातावरची कमाई.....
बागवान, दलाल व ठेकेदार ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतावरील बांधावर असलेली चिंचेची झाडे घेतात. त्या झाडावरील चिंचा पाडून व्यापाऱ्यांना विक्री करतात. एक कुटुंब दिवसाला किमान अर्धा ते पाऊण क्विंटल चिंचा फोडतात. लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या सुरक्षितपणे चिंचा फोडण्याचा रोजगार मिळाल्याने हातावर पोट असणाऱ्या आमच्या सारख्या मजुरांना कमाईमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
- रुबिना आरिफ शेख, चिंचा फोडणारी मजूर महिला, लोणी, ता.राहाता.