अहमदनगर: लॉकडाऊनमुळे शेतकरी आधीच अर्थिक संकटात असतानाच आता ऊस लागवडीच्या खर्चातही वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि मजुरी वाढल्याने एकर लागवडीसाठी एकरी १६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ऊस लागवडीच्या खर्चाचे नियोजन कोलमडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची झळ शेतकऱ्यांनाही बसत आहे. सरकारने डिझेलचे दर वाढविल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यात कोरोनाच्या भीतीने शेती कामासाठी मजूर मिळत नाही. वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. सध्या आडसाली ऊस लावगड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. परंतु, ऊस लागवडीचा खर्च गगनाला भिडला आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे नांगरटीसाठी एकरी २५०० रुपये मोजावे लागत आहेत. एक एकरसाठी सुमारे २ टन ऊस लागतो. कारखाने बंद झाल्याने ऊस बेणेही महागले आहेत. चांगल्या प्रतीच्या बेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. एक टन उसासाठी साधारण २२०० ते २५०० रुपये लागतात. तसेच कोरोनाच्या भीतीने शेती कामासाठी मजूर मिळत नाहीत. उसाची लागवड करण्यासाठी एकरी साडेसहा हजार रुपये मजुरी लागते. मागीलवर्षी ऊस लागवडीचा खर्च कमी होता. चालूवर्षी मात्र त्यात ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोरोनामुळे शेतीमालाच्या किमती घसरल्या आहेत. काही कारखान्यांनी मागील उसाचे पेमेंट दिलेले नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. साधारणपणे १५ जूननंतर आडसाल उसाची लागवड करण्याची पध्दत आहे. परंतु, या काळात सर्वच शेतकरी उसाची लागवड करत असतात. त्यामुळे वेळेवर ऊस तुटून जात नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे पाणी आहे, असे शेतकरी पाऊस पडण्याआधी मे महिन्यात उसाची लागवड करून घेतात. पाऊस पडल्यानंतर खतांची मात्रा देऊन ऊसवाढीला चांगला फायदा होतो. त्यामुळे या महिन्यातच उसाची लागवड सुरू असून, वाढत्या खर्चामुळे लागवडीचे नियोजन कोलमडले आहे.
......
ऊस लागवडीसाठी असा येतो खर्च
नांगरट प्रति एकर- २२०० ते २५०० रुपये
ऊस बेणे- प्रति टन- २ हजार ५०० रुपये
मजुरी- ६ हजार ५००
रासायनिक खतांची मात्रा- २ हजार
....
डिझेलचे वाढलेले दर, कोरोनामुळे मजुरीत झालेली वाढ आणि बेणे महाग झाल्याने ऊस लागवडीचा खर्च यंदा वाढला असून, त्यामुळे एक एकर ऊस लागवडीसाठी १६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. पाऊस पडल्यानंतर ऊस लागवडीचा खर्च आणखी वाढणार आहे.
- शेतकरी, नेवासा तालुका