अहमदनगर : पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करीत नगर शहर शिवसेनेच्या वतीने शनिवारी माळीवाडा बसस्थानक चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध करण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने एस.टी. बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध बैलगाडीवर चढून करण्यात आला, तसेच शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचाही निषेध करण्यात आला. संगमनेर, शिर्डी, अकोले, नेवासा, कर्जत, जामखेड येथेही आंदोलन करून दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले, तर काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. नगरमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थही निदर्शने करण्यात आली. बैलगाडीत बसून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात माजी महापौर माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड आदींची उपस्थिती होती.