शेवगाव : मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून शेवगाव, १७ वर्षे वयोगटातून कर्जत तर १९ वर्षे वयोगटातून नगर तालुका संघाने अजिंक्यपद पटकावले. या तीनही संघांची सोलापूर येथे आयोजित विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली.जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी वरील तीनही वयोगटातील एकूण ४५ तालुकास्तरीय संघ सहभागी झाले होते. १४ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात शेवगावने कर्जतवर ५ मिनिटे राखून मात केली. शेवगाव येथील बाळासाहेब भारदे विद्यालयातील प्रगती कंठाळी, करुणा उबाळे, ज्ञानेश्वरी गाडे, प्राची कर्डिले, निकिता वावरे यांनी बहारदार खेळाने क्रीडा प्रेमींची मने जिंकली. १७ वर्षे गटातील कर्जत व नेवासा संघात चुरशीच्या लढतीत कर्जतने एक गुण व एक मिनीट राखून विजय संपादन कला. या सामन्यात कर्जतच्या शिल्पा सांगळे, रूपाली सुपेकर, अनुजा गुंड, सपना सुद्रीक यांनी तर नेवाशाच्या किरण गव्हाणे व गौरी भगत यांनी चमकदार कामगिरी केली. १९ वर्षे वयोगटातील नगर व कर्जत संघात झालेल्या अंतिम समान्यात नगरने १ डाव व ४ चार गुणांच्या फरकाने विजयश्री प्राप्त केली. या सामन्यात रोहिनी मोरे, निकिता उनवणे, पायल गांधी, प्रियंका बारजे, शितल गायकवाड, आकांक्षा गुंड, शितल गुंड, कल्पना नेटके या खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ केला. या स्पर्धेत तीनही गटातून अजिंक्यपद पटकावलेल्या शेवगाव, कर्जत व नगर संघाची सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर चपळगावकर, शेवगाव स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष अरुण वावरे, क्रीडा शिक्षक सचिन शिरसाठ यांनी दिली. अंतिम सामन्यासाठी उन्मेष शिंदे, भाऊसाहेब पवार, दत्ता वाघ, प्रताप तांबे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
शेवगाव, कर्जत, नगर तालुका अजिंक्य
By admin | Updated: August 31, 2014 23:59 IST