श्रीगोंदा : हिंगणी (ता. श्रीगोंदा) येथील घोड नदीपात्रात वाळू उपशा विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्या शासकीय जीपला धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हिंगणी-गव्हाणेवाडी शिवारात ही घटना घडली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ श्रीगोंदा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी या घटनेचा निषेध करून ‘काम बंद’ आंदोलन केले. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी एका ट्रक चालकाविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंडलाधिकारी मोहमद इकबाल जाफर पठाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादित म्हटले आहे, १४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गव्हाणेवाडी- हिंगणी शिवारात वाळूउपसा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद दानेज यांना मिळाली. त्यानुसार महसूल पथक हिंगणी-गव्हाणेवाडी रस्त्याने जात असताना सोनवळकर वस्तीनजीक समोरून वाळूचा ट्रक (ट्रक क्र. एम. एच. स १६- एई- ४०३४) आला. ट्रक चालकास थांबण्याची विनंती केली असता तो भरधाव वेगाने निघून गेला. महसूल पथकाने गाडी पाठीमागे वळवत ट्रकचा पाठलाग केला. जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पाठलाग करूनही ट्रक थांबला नाही. काही अंतर पुढे गेल्यानंतर शासकीय जीप चालकाने जीप पुढे घेण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने जीपला कट मारून प्रांताधिकारी दानेज व जीपमधील इतर महसूल कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने ट्रक आडवी घालून चालक पसार झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)प्रांताधिकारी गोविंद दानेज यांना जिवे मारण्याच्या प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ श्रीगोंदा महसूल कर्मचाऱ्यांनी शनिवारी ‘काम बंद’ आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. हल्ला करणाऱ्याला तत्काळ अटक करावी, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार वंदना खरमाळे यांना देण्यात आले. या वेळी उल्हास गटकळ, जे. एस. सदाफुले, श्रीकांत गोरे, चंद्रकांत दुर्गे, सीताराम आल्हाट, अश्विनी गायकवाड, नीता उदमले, रावसाहेब लांडगे व इतर महसूल कर्मचारी हजर होते.
वाळू तस्कराकडून प्रांताधिकाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Updated: October 16, 2016 01:10 IST