सदस्या डॉ. मुरकुटे यांनी इमारतीच्या बांधकामाची मंगळवारी पाहणी केली. यावेळी एवढे मोठे काम रामभरोसे चालू आहे, असा आरोप डॉ. मुरकुटे यांनी केला. इमारतीच्या बांधकामाची देखरेख करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांची असते. परंतु पंचायत समितीत हे पद रिक्त असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता प्रकाश खताळ यांना बांधकामचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेतील उत्तर विभागातील पाणीपुरवठा विभागात ते कार्यकारी अभियंत्याचाही कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना नगरला अधिक काळ थांबावे लागते.
नूतन इमारत बांधकाम देखरेखीची जबाबदारी खताळ यांनी पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे न सोपवता पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता गणेश गुंजाळ यांच्यावर सोपविली. गणेश गुंजाळ यांनीही आपल्या विभागातील कनिष्ठ सहकारी पुंजा वाघ यांच्याकडे जबाबदारी दिली. अशाप्रकारे खो-वर खो देत बांधकाम देखरेख सुरू आहे, असा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला आहे.
बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उपलब्ध असताना पाणीपुरवठा विभागाकडे जबाबदारी सोपविण्याचे कारण काय? हे कोडे पडले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारतीच्या कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे सदस्यांनी म्हटले आहे. याप्रश्नी प्रभारी गटविकास अधिकारी एस. आर. दिघे यांना विचारले असता, बांधकाम व्यवस्थितपणे सुरू असून देखरेख करणारे अधिकारी हे मूळचे बांधकाम विभागातील आहेत, केवळ त्यांची नियुक्ती ही पाणी पुरवठा विभागात आहे, असे त्यांनी सांगितले.