सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा व गोरेगाव परिसर गावरान आंब्यांसाठी प्रसिद्ध असून, यंदा मोहरही मोठ्या प्रमाणावर आला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणाने व पावसाच्या सरींनी मात्र फटका बसण्याची चिन्हे आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
यापूर्वी शेताच्या कडेला बांधावर लावलेली गावरान वाणाची आंब्यांची झाडे आजही तग धरून आहेत. काही शेतकऱ्यांनी मात्र त्याचा वसवा पडतो व तेथे काहीच पीक येत नसल्याने ही झाडे तोडली. सध्या गोड फळ देणाऱ्या वाणाच्या आंब्याची लागवड करून शेतकऱ्यांनी प्रसंगी डोक्यावर हंड्याने पाणी घालून ही रोपटी जगविली. नंतरच्या काळात मात्र त्याला फळे येऊ लागली. दुष्काळाचे चटके बसू लागल्याने दरवर्षी फळांची बरसात करणारी ही झाडे फळाविना दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी काही झाडे तोडली. काही झाडांना वर्षाआड फळे येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी पावसाळ्यात भरपूर पाऊस झाला. परिणामी झाडांना भरपूर मोहर आला. त्यामुळे गावरान आंब्याची चव चाखता येईल. त्या माध्यमातून चार पैसे हाती येतील, म्हणून बळीराजा सुखावला असतानाच निसर्गातील वातावरण बदलाचा फटका बसणार, अशी चिन्हे निर्माण झाली. ढगाळ वातावरणात झाडावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोहर गळून जातो. ऐन फळे लागण्याच्या वेळी पडलेल्या रोगाने फळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.