श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते, कुुकडी कारखाना बचाव समितीची बैठक पार पडली. यावेळी कारखाना निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती ॲड. बाळासाहेब पवार व मधुकर टकले यांनी दिली.
यावेळी विद्यमान संचालक बाजीराव मुरकुटे यांची प्रमुख उपस्थित होती. कुकडी कारखाना उभारणीसाठी १२ हजार १३८ सभासदांनी बँकेचे व्याज भरून व घरातील दागिने मोडून शेअर्स खरेदी केले. कारखाना उभारणीस महत्त्वाचे योगदान असणाऱ्या अशाच ५ हजार ४११ सभासदांचे सभासदत्व रद्द केले. सभासदांमध्ये जास्तीत-जास्त मर्जीतील लोक, नातेवाईकांची नावे शिल्लक ठेवून कारखान्याची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू केली आहे, असे आरोप करत रद्द केलेल्या सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत, यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना निवेदन देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
कार्यक्षेत्रात नसणारे, ऊस उत्पादक नसणारे, बिगर सभासद यांना प्रचंड प्रमाणात कोट्यवधींचे ॲडव्हान्स वाटप केले आहे. त्यामुळे कारखाना अडचणीस आला आहे. पंदरकर यांनी बोगस सभासदांची नावे उघडकीस आणल्यामुळे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी ५९६ सभासद रद्द केले आहेत व आणखी काही मर्जीतील बोगस सभासद असण्याची शक्यता आहे. तसेच २०१७-१८ मधील प्रतिटन ५०० रुपयांचे थकीत उसाचे पेमेंट अद्याप दिलेले नाही. याबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी झाली.
यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी निवडणूक सर्वशक्तीनिशी लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच सर्व सभासदांनी २२ फेब्रुवारीपूर्वी आपली नावे मतदार यादीत आहेत किंवा नाही याची खात्री कारखाना कार्यस्थळावर जाऊन करावी. काही अडचणी असल्यास हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीस कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील प्रमुखांसह ऊस उत्पादक सभासद, शेतकरी हजर होते.