अहमदनगर : वॉरंट रद्द केल्याबाबतची कागदपत्रे देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन विठ्ठल डहारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर येथे अटक केली.डहारे हे कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट नं. ९) यांनी तक्रारदार यांना बजावलेले न्यायालयाचे वॉरंट रद्द केले होते. याबाबतच्या दंडाची पावती आणि कोर्टाचे पत्र हजर करून घेण्यासाठी व तसा अहवाल न्यायालयास सादर करण्यासाठी डहारे याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती पाचशे रुपये देण्याचे ठरले. याची तक्रार एसीबीकडे केल्यानंतर उपअधीक्षक इरफान शेख यांनी सापळा लावून डहारे याला पंच-साक्षीदारांसमक्ष अटक केली. एसीबीचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, चंद्रशेखर सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, वसंत वाव्हळ, काशिनाथ खराडे, पोलीस नाईक नितीन दराडे, एकनाथ आव्हाड, तन्वीर शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसाने घेतली पाचशे रुपयांची लाच
By admin | Updated: August 10, 2016 00:25 IST