कर्जत : आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर माळंगी येथे जमावाने हल्ला केला. पोलिसांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची जमावाने सुटका केली. हा थरार गुरुवारी सकाळी तालुक्यातील माळंगी येथे घडला.सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने कर्जत तालुक्यात माळंगी येथे रस्ता लुटीतील आरोपीस पकडले होते. हे पथक सकाळी माळंगी येथे आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले. आरोपी घराजवळच होता. पोलीस पथकाला पहाताच त्याने धूम ठोकली. पोलिसांना धरा, मारा, असा ओरडा जमावाने केला. त्यांच्या या आवाजास आसपासच्या लोकांनी साद घातली. ४० ते ५० जणांनी पोलीस पथकावरच हल्ला केला. पोलीस कर्मचाऱ्यास काठीने मारले आणि पोलीस गाडीची काच फोडली. अशा बिकट स्थितीत पोलीस पथकातील कर्मचाऱ्याने येथील आरोपीस पकडण्यात यश मिळवले. कराड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या कारवाईसाठी अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेची मदत घेतली. पकडलेल्या आरोपीस घेऊन निघण्याच्या तयारीत असताना पकडलेल्या आरोपीस सोडण्यासाठी पुन्हा या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून पकडलेल्या आरोपीची जमावाने सुटका करून घेतली.(तालुका प्रतिनिधी)
पोलीस पथकावर हल्ला
By admin | Updated: May 20, 2016 00:27 IST