अहमदनगर : निस्सिम व नि:स्वार्थ भावनेने केलेली रुग्णसेवा हीच खरी ईश्वरी सेवा असून, येथील जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या रुग्ण सेवेचे इतरांनी अनुकरण करावे. युवकांनी उभारलेले हे समाजसेवेचे कार्य निश्चितपणे चांगले दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्ताने हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या मोफत तपासणी व उपचार शिबिरास हजारे यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिराचे दीपप्रज्वलन हजारे यांच्या हस्ते झाले. यावेळी अॅड. शाम आसावा, डॉ. प्रकाश कांकरिया, सुधा कांकरिया, अभय गुगळे, वसंत चोपडा, रवींद्र मुथा, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, डॉ. आशिश भंडारी आदी उपस्थित होते.हजारे म्हणाले की, ‘माझे ते माझे तुझं तेही माझं’ अशी वाईट प्रवृत्ती सर्वत्र बळावत आहे. स्वत:च्या पलीकडे इतर जग लोकांना माहित नाही. समाजाचे व देशाचे कोणालाही देणे-घेणे नाही, अशाही व्यवस्थेतून आपण पुढे जात आहोत. परंतु मनुष्याने हे लक्षात घ्यावे. सर्वांगीण विकास केवळ समाजाच्या चांगल्या बदलातून घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आभार भंडारी यांनी मानले. सूत्रसंचालन दत्तात्रय वारकड यांनी केले. (प्रतिनिधी)
रुग्णसेवा हीच खरी ईश्वराची पूजा
By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST