यासंदर्भात अश्विनी विकास लवांडे (वय २९, रा. लवांडेवस्ती, कारेगाव, श्रीरामपूर, सध्या रा. येवले आखाडा, राहुरी) यांनी राहुरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेेश धनवटे यांनी हा अघोरी प्रकार उजेडात आणला. पोलिसांनी पती विकास विश्वनाथ लवांडे, सासरा विश्वनाथ रखमाजी लवांडे, नणंद पूनम विश्वनाथ लवांडे, मामेसासरा किशोर सीताराम दौंड, मामेसासू प्रमिला किशोर दौंड व कारेगाव परिसरातील मांत्रिक अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनीचा विवाह सव्वा वर्षापूर्वी झाला होता. परंतु विवाहानंतर काही दिवसांतच तिच्या सासूचे निधन झाले. सासूचे निधन अश्विनी घरात आल्यामुळेच झाले. त्यामुळे ती अपशकुनी आहे, असे समजून सासरच्या लोकांनी तिच्यावर मांत्रिकाच्या सल्ल्याने अघोरी प्रयोग सुरू केले. त्यातून तिचा छळ सुरू केला. त्यानंतर अश्विनीला तिच्या वडिलांनी आपल्या घरी आणले व पोलिसात फिर्याद दिली.