अहमदनगर : महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात घरगुती पाणीपट्टीत दुपटीने प्रस्तावित केलेली वाढ तसेच अग्निशमन कराची वाढ स्थायी समितीने फेटाळली आहे. स्थायी समितीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र व्यावसायिक, औद्योगिक पाणीपट्टी तसेच टॅँकरने पाणीपट्टी वाढीस स्थायी समितीने मान्यता दिली. आता पाणीपट्टी दरवाढीचा चेंडू स्थायी समितीने महासभेकडे टोलावला आहे. प्रस्तावित दर-करवाढीच्या ७३३ कोटी ८९ लाखाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची सभा बुधवारी सभापती गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. नगरसेवक अनिल बोरूडे, श्रीपाद छिंदम, उषा नलावडे, छाया तिवारी, आयुक्त विलास ढगे, उपायुक्त अजय चारठाणकर, भालचंद्र बेहेरे यावेळी उपस्थित होते. या अंदाजपत्रकात घरगुती पाणीपट्टी अर्धा इंची दीड हजारावरून तीन हजार, पाऊण इंची तीन हजारावरून सहा हजार, एक इंची सहा हजारावरून दहा हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली होती. घरगुती दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला. अर्थसंकल्पात प्रशासनाने व्यावसायिक पाणीपट्टीत वाढ प्रस्तावित केली होती. अर्धा इंची पाच हजार चारशे वरून दहा हजार, पाऊण इंची दहा हजार आठशेवरून वीस हजार, एक इंची बावीस हजारावरून चाळीस हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात अपंग कुष्ठरोेग्यांना एक हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.महापालिकेच्या शहरात १२ शाळा असून त्यामध्ये १ हजार १३० विद्यार्थी आहेत. त्यासाठी ४७ शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षण मंडळासाठी अर्थसंकल्पात ३ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात मनपा शाळांचा दर्जा वाढवावा तसेच पटसंख्या वाढवावी, तसे न झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना सभापती गणेश भोसले यांनी केली.
पाणीपट्टी दरवाढीस स्थायीचा नकार
By admin | Updated: March 9, 2016 23:59 IST