अहमदनगर : ‘नीट’ परीक्षेच्या सक्तीतून विद्यार्थ्यांना वर्षभराचा दिलासा मिळाला असल्याच्या वृत्ताने जिल्हाभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘नीट’मुळे टेन्शनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी केंद्र सरकारने या परीक्षेतून आणखी एक वर्ष सूट द्यावी, अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने ‘नीट’ची अंमलबजावणी वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्याच्या अध्यादेशाला शुक्रवारी तत्वत: मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ‘नीट’ संदर्भात काय निकाल लागतो, याकडे लक्ष होते.‘नीट’मुळे वर्षभरापासून स्टेट बोर्डाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि पालक यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. ‘नीट’चा अभ्यास कसा करावा, कोणत्या पुस्तकांचा आधार घ्यावा, याबाबत संभ्रम होता. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयाने वर्षभरासाठी विद्यार्थ्यांचा त्रास वाचला आहे. मात्र, केंद्र सरकारने हा निर्णय आणखी वर्षभरासाठी वाढवावा. आता दहावी सुटणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएससी पद्धतीने अभ्यासक्रम देवून त्यांची ‘नीट’द्वारे परीक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)केंद्र सरकारचा निर्णय सीईटीनुसार अभ्यास करणाऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे. विशेषकरुन गरीब विद्यार्थ्यांना ‘नीट’ची फी जमा करण्यासाठी वर्षभराचा कालावधी मिळणार आहे. ‘नीट’वरून टेन्शनमध्ये असणारे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या निर्णयाने आनंदित होणार आहेत. - अमरजा रेखी, प्राचार्या, सारडा महाविद्यालय.
‘नीट’ लांबणीवर पडल्याने पालक, विद्यार्थी आनंदित
By admin | Updated: May 20, 2016 23:59 IST