अहमदनगर : सातत्याने पाच वर्षापासून दुष्काळाचा सामना करून हैराण झालेल्या सारोळा कासार (ता. नगर) गावाला जलयुक्त शिवार अभियानामुळे यंदाच्या पावसाळ्यात नवसंजीवनी मिळाली आहे. लोकसहभागातून ७५ लाख वर्गणी जमवून गावाने पूर्वा नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केले. परतीच्या पावसाने गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पावसामुळे हे सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. लोकसहभागातून झालेले हे काम गावाला दुष्काळमुक्तीकडे नेणारे ठरल्याने गावकऱ्यांनी पाण्याचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.सततच्या दुष्काळामुळे वैतागलेल्या गावाने जलयुक्त अभियानाची कास धरली. सरपंच रवींद्र कडूस यांनी गावकऱ्यांना लोकवर्गणी साठी हाक दिली. गावातील व नोकरीनिमित्त राज्याबाहेर असलेल्या गावकऱ्यांनी या अभियानात हात झटकून योगदान दिल्याने सुमारे ७५ लाखांची वर्गणी जमा झाली. जमा झालेल्या वर्गणीतून गावाला वळसा घातलेल्या पूर्वा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने नदीवर बांधण्यात आलेले सर्व आठ बंधारे तुडूंब भरून वाहू लागले आहेत. हे शिवार जलमय होण्यासाठी आसुसलेल्या गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. गावकऱ्यांनी वाजत-गाजत जल्लोष करीत नदीवरील पाण्याचे पूजन केले. यावेळी मंगलभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी, सरपंच रवींद्र कडूस, उपसरपंच सविता साळवे, सदस्य दत्तात्रय कडूस, विलास धामणे, अरुण शिंगाडे, जयप्रकाश पाटील, संजय काळे, सतीश कडूस तसेच गावातील वृद्ध, शाळकरी मुले या आनंदोत्सवात सहभागी झाले.गावातील पूर्वा नदीचे सुमारे दहा कि.मी.जलसंधारणाचे काम करण्यात आले. शासकीय योजनेला गावकऱ्यांनी लोकसहभागाची जोड दिल्याने हे काम यशस्वी झाले. गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळाशी लढता-लढता वैतागलेल्या सारोळा गावातील गावकऱ्यांना तुडूंब भरलेले बंधारे पाहून हे स्वप्नवत वाटत होते.या पाण्यामुळे गावाला लागलेली पाणी टंचाईची ‘साडेसाती’ आता संपणार तर आहेच शिवाय गाव आता कायमचे टँकरमुक्त होणार याचाच आनंद गावकऱ्यांच्या विशेषत: महिलांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून येत होता. (तालुका प्रतिनिधी)
सारोळाकासारची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल
By admin | Updated: October 5, 2016 00:23 IST