अहमदनगर : राहुरीच्या डॉ. बाबुराव तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे ११५ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. ही थकीत देणी तातडीने मिळावीत, या मागणीसाठी राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने बैठक बोलवली असून त्या ठिकाणी थकीत देणी संदर्भात तोडगा काढण्यात येणार आहे. डॉ. तनपुरे कारखान्याचे २०११ ते २०१४ या काळातील कामगारांच्या पगाराचे ४३ कोटी, ग्रॅच्युईटी १५ कोटी ९९ लाख, कामगारांच्या पगारातून कपात केलेली सहकारी सोसायटी रक्कम ४ कोटी ७५ लाख, वेतन वाढीचा फरक ६ कोटी २६ लाख, प्रा. फंडाची कपात भरणा ४ कोटी २५ लाख असे थकीत ११४.५७ कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. कारखाना व्यवस्थापनाने कामगार व ऊस उत्पादक सभासद यांच्या अडचणीसंदर्भात वेळावेळी केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोणत्याही आर्थिक योजनेचे लाभ कामगार व ऊस उत्पादकांना दिलेले नाहीत. कामगारांचा थकीत पगार आणि अन्य देणी मिळण्यासाठी राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते. त्यापार्श्वभूमीवर सहाय्यक सहसंचालक मिलींद भालेराव यांनी बैठक बोलविली आहे. या बैठकीला कारखाना व्यवस्थापन, संचालक मंडळाचे प्रतिनिधी, कामागारांचे प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती कृषी अधिकारी मच्छिंद्र कुसमुडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘तनपुरे’ संदर्भात सोमवारी बैठक
By admin | Updated: August 31, 2014 23:59 IST