लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : रेमडेसिविरच्या काळाबाजार प्रकरणात केवळ वार्डबॉय व औषध दुकानातील नोकराला अटक करण्यापर्यंत शहर पोलिसांचा तपास पोहोचला आहे. मात्र, आरोपींना विक्रीसाठी रेमडेसिविरचा पुरवठा करणाऱ्या खऱ्या सूत्रधारांपर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत. पोलिसांच्या या बोटचेप्या भूमिकेमुळे तपासविषयी संशय व्यक्त होत आहे.
शहरातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करताना शुभम श्रीराम जाधव (वय २१, रा. आंबेजोगाई, जि. बीड) व प्रवीण प्रदीप खुने (वय २३, रा. भातंबरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चार हजार ८०० रुपयांच्या दोन इंजेक्शनची हे दोघे ४० हजार रुपयांना एका रुग्णाच्या कुटुंबियांना विक्री करत होते. त्यांच्याकडे इंजेक्शनचे बिल अथवा डॉक्टरची चिठ्ठी सापडली नव्हती. हे दोघे आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
याप्रकरणी संजय रुपटक्के या कार्यकर्त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाधव व खुने यांना अटक केली. दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
गुरुवारी पोलिसांनी या गुन्ह्यात दिनेश उर्फ रेवन्नाथ संजय बनसोडे या औषध दुकानात कामाला असणाऱ्या मुलाला अटक केली. न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी अटक केलेले वार्डबॉय तसेच औषध दुकानातील नोकर हे आरोपी केवळ प्यादे आहेत. त्यांच्याकडे विक्रीसाठी रेमडेसिविर इंजेक्शन कोणी दिले? हे अद्यापही तपासात समोर आलेले नाही. रेमडेसिविरला सध्या सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे वार्डबॉय अथवा औषध दुकानातील नोकराच्या मागे लपलेल्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पोलीस अटक का करत नाहीत? हा मुख्य प्रश्न आहे.
-------
फिर्यादीत डॉक्टरचे नाव
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत आरोपी प्रवीण प्रदीप खुने याने आपण डॉ.अक्षय शिरसाठ याच्याकडे वार्ड बॉय म्हणून कामाला असून डॉक्टरनेच आपल्याला इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याचे म्हटले आहे.
-----
रेमडेसिविरला आलेले महत्व लक्षात घेता या गुन्ह्याच्या तपासाकडे जिल्हा पोलीस प्रमुखांचे लक्ष लागलेले आहे. गुन्ह्याचा तपास निःपक्षपातीपणे होईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. सबळ पुरावे मिळताच दोषींवर कारवाई करण्यात येईल.
-संजय सानप, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, श्रीरामपूर.
------