अहमदनगर : अबालवृद्धांचा आवडता दिवाळी सण अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला असून, घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे़ धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत शुक्रवारी खरेदीसाठी सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती़ कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहनांसह सोने-चांदीची मोठी खरेदी झाली़ दिवसभरात बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली़ दिवाळीच्या खरेदीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे़ सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने बाजारपेठ हाऊसफुल्ल आहेत़ शहरातील कापड बाजार, मोची गल्ली, नवी पेठ, टिळक रोड, माणिक चौक, सावेडी परिसरात, पाईपलाईन रोड, माळीवाडा, सराफबाजार, गंजबाजार, दिल्ली गेट आदी ठिकाणी विविध दुकांनात ग्राहक गर्दी करत आहेत़ यंदा जिल्हाभरात चांगला पाऊस झाल्याने दिवाळी सणाचा उत्साह द्विगुणित झाला आहे़ यंदा प्रत्येक वस्तुंचे दर दहा ते पंधरा टक्यांनी वाढले असले तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही़ दिवाळीत सर्वाधिक कपड्यांची खरेदी होते़ दिवाळीनिमित्त बाजारपेठेत बहुतांशी दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध खरेदी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत़ नवीन, आकर्षक आणि विविध व्हरायटीज्मधील कपडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत़ वाहन खरेदीचाही शुक्रवारी अनेकांनी मुहूर्त साधला़ मोठ्या वस्तुंसह दिवाळी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तुंचे शहरात विविध ठिकाणी स्टॉल लागले आहेत़(प्रतिनिधी) दिवाळीत घरांच्या छतावरील खास आकर्षण म्हणजे आकाशकंदील़ बाजारपेठेत रंगीबेरंगी, आकर्षक व विविध डिझाईनमध्ये आकाशकंदील खरेदीसाठी गर्दी होत आहे़ आकाशकंदिलांच्या झगमगाटात बाजारपेठ उजळून निघाली आहे़ १०० रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील विक्रीसाठी आहेत़ यामध्ये हॅण्डमेड कंदिलांना मोठी मागणी आहे़ सध्या सर्वच क्षेत्रात आॅनलाईन कामकाज सुरू झाले असले तरी पारंपरिक ‘खतावणी’ आपले महत्त्व अबाधित राखून आहे़ शुक्रवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर व्यावसायिकांनी खतावणींची खरेदी केली़ अगदी तळहाताच्या आकारातील खतावण्यांपासून ते मोठ्या आकारातील खतावण्यांची विक्री झाली़ दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खतावणीचीही पूजा करण्याची व्यापारी वर्गात परंपरा आहे़ शहरासह उपनगरातील इमारतींवर रंगीबेरंगी लाईटमाळांची चमक वाढली असून, बाजारपेठेत शुक्रवारी लाईटमाळांसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत होती़ बाजारपेठेत यंदा ग्राहकांनी मेड इन चायनाच्या लाईटमाळांना बाय करत इंडियन लाईटमाळांनाच जास्त पसंती दिली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ चायनापेक्षा इंडियन माळा टिकाऊ असल्याचे ग्राहकांचे मत आहे़
दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठ हाऊसफुल्ल
By admin | Updated: October 29, 2016 00:48 IST