याप्रकरणी हर्षल शिवशंकर चौधरी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल चौधरी यांच्यासोबत नगर तालुक्यातील खडकी येथील यादव व जाधव नावाच्या दोघा व्यक्तींनी फोनवरून संपर्क वाढविला. तुम्हाला स्वस्तात पाहिजे तेवढे गोडेतेलाचे डबे देतो, असे असे आमिष दाखविले. गोडेतेल पाहण्यासाठी चौधरी यांना बुधवारी दरोडेखोरांनी खोसपुुरी शिवारातील निर्जनस्थळी बोलावून घेतले. चौधरी घटनास्थळी येताच लपून बसलेल्या सहा जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी चौधरी यांच्याकडील रोख ६० हजार रुपये, एक आयफोन, एक साधा मोबाइल व एक घड्याळ, असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून दरोडेखोरांनी पोबारा केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जारवाल हे पुढील तपास करत आहेत.
.................
आधी सोन्याचे आता खाद्यपदार्थांचे आमिष
स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटमारीच्या अनेक घटना नगर जिल्ह्यात घडलेल्या आहेत. आता स्वस्तात सोन्याच्या आमिषाला कुणी बळी पडत नसल्याने या दरोडेखोरांनी व्यापाऱ्यांशी संपर्क करून स्वस्तात खाद्यपदार्थ देण्याचे आमिष दाखवण्याचे काम सुरू केले आहे. काही वर्षांपूर्वी स्वस्तात बदाम देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला नगर तालुक्यात अशाच पद्धतीने लुटले होते.