अहमदनगर : केंद्र शासनाने सोन्यावर लावलेला अबकारी कराचा निषेध म्हणून नगर येथील सराफांनी बाजारपेठेत काळी गुढी उभारली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला. केंद्र शासनाने सोन्यावर एक टक्का अबकारी कर लावला आहे. सराफी व्यावसायिकांनी त्यास विरोध केला असून तो रद्द करावा, यासाठी देशभर बंद पुकारला आहे. गत महिनाभरापासून सराफांचे बंद आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने मात्र तो रद्द केला नाही अन् सराफा संघटनांशी तडजोडही केलेली नाही. नगर शहरातील सराफांनी सराफ बाजारात एकत्रितपणे काळी गुढी उभारली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन केले. सराफांनी केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. जोपर्यंत अबकारी कर रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रकाश लोळगे, राजेंद्र शहाणे, विशाल वालकर, सुभाष कायगावकर, संतोष देडगावकर, निळकंठ देशमुख, रसीक कटारिया, प्रमोद बुऱ्हाडे, शिवनारायण वर्मा, विजय रायमोकर, राजेश मिरांडे, तन्नू वर्मा, संतोष मुथा, कैलास मुंडलिक, सुनील डहाळे, गणेश कुलथे आदीसह सराफ यावेळी उपस्थित होते. सराफ बाजार बंद असल्याने मुहूर्तावर सोने खरेदी ग्राहकांना करता आली नाही. मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. सराफ बाजार बंद असल्याने ही उलाढाल ठप्प झाली. (प्रतिनिधी)
सराफांची बाजारपेठेत ‘काळी गुढी’
By admin | Updated: April 9, 2016 00:31 IST