माने यांनी सांगितले की, जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली तेव्हा मी त्यांच्यासोबत होते. जरे यांचा पाय दुखत असल्याने पुणे येथून येताना प्रथम मी कार चालवत होते. नंतर त्यांच्या मुलाच्या सूचनेवर जरे या कार चालवू लागल्या. जातेगाव घाट परिसरात कार आली तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आमच्या कारला कट मारल्याने आरशाला धक्का लागला. यावेळी कार थांबविली तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुला गाडी व्यवस्थित चालविता येत नाही का, येत नसेल तर कशाला गाडी शिकलीस, तुझ्या मुलालाही येत नाही का, असे म्हणत मारेकऱ्यांनी जरे यांना नाव विचारले. जरे यांनी नाव सांगत मी आमदारांना व पोलीस स्टेशनला फोन करते, अशा म्हणाल्या. याचवेळी दोघांमधील एकाने जरे यांना कारमध्ये मागे ढकलून त्यांच्या गळ्यावर वार केला. हे पाहून जरे यांच्या आई ओरडल्या. यावेळी मी माझा फोन बंद केला आणि जरे यांच्याकडे पाहिले तेव्हा मला धक्का बसला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी मी प्रथम १०० क्रमांकावर फोन केला पण नॉटरिचेबल असे सांगत होते. यावेळी कारमधील सर्वांच्या जीविताला धोका आहे, हे लक्षात घेत जरे यांना दुसऱ्या शीटवर बसविले. त्यानंतर मी स्वत: कार चालवून जरे यांना सुपा टोल नाक्यापर्यंत आणले. तेथून रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, असा घटनाक्रम माने यांनी माध्यमांसमोर उलगडला.
आरोपीच्या दृश्यमची दोन दिवसांत पोलखोल
दुचाकीला कारचा कट लागल्याचे कारण पुढे करत मारेकऱ्यांनी जरे यांच्याशी वाद घालून त्यांची हत्या केली. घटनेनंतर जरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे तत्काळ तेथे दाखल झाला. त्याने जरे यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्याचे नाटक केले. दुसऱ्या दिवशीही बोठे शवविच्छेदनादरम्यान रुग्णालयातच वावरत होता. त्यानंतर तो जरे यांच्या घरी व नंतर अंत्यविधीलाही उपस्थित होता. ही हत्या कट रचून केल्याचा संशय येऊ नये म्हणून प्रथम मारेकऱ्यांनी घातलेला वाद आणि त्यानंतर बोठे याचा तो मी नव्हेच, अशा पद्धतीचा वावर हे एक वेगळेच दृश्य निर्माण करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी मात्र अवघ्या दोन दिवसांत या हत्याकांडाची उकल करत आरोपींच्या दृृश्यमची पोलखोल केली.