कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करुन सोन्या, चांदीचे दागिने मिळून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला. यावेळी चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, कोपर्डी मार्गालगत राहणारे दत्तू ज्ञानदेव सुपेकर यांच्या बंगल्यात प्रवेश करुन चोरट्यांनी कपाटातील दोन तोळे सोने व दोन हजारांची रोकड लांबविली. अचानक जागे झालेले सुपेकर यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार दगडफेक करीत चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा विद्यालयानजीक राहणारे आबासाहेब कोंडीबा सुपेकर यांच्याकडे वळविला. दागिने हिसकावले बाहेर झोपलेले सुपेकर व त्यांच्या गड्याला चोरट्यांनी मारहाण केली व स्वयंपाकगृहात कोंडून आरडा न करण्यासाठी दम दिला. नंतर चोरट्यांनी जवळच राहणारे त्यांचे भाऊ पोपट कोंडीबा सुपेकर यांच्या बंगल्याला लक्ष्य केले. बाहेर झोपलेल्या त्यांच्या पत्नी सुंदराबाई यांच्या अंगावरील दागिने दोघा चोरट्यांनी हिसकावले. त्यावेळी चोरट्यांशी झालेल्या झटापटीत त्यांचा कान तुटला. त्यावेळी केलेल्या आक्रोशाने त्यांचा बंगल्यात झोपलेला मुलगा अरविंद दरवाजा उघडून बाहेर आला. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांना घरात ओढत नेले. चोरट्यांशी प्रतिकार चोरट्यांशी प्रतिकार सुरु ठेवल्याने आणखी दोन चोरटे घरात घुसले व अरविंद यांच्यावर कोयत्याने वार केले. कोयत्याचा वार रोखताना त्यांची दोन बोटे तुटली. त्यानंंतर डोक्यात केलेल्या जोरदार हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. तेवढ्यात गच्चीवर झोपलेले त्यांचे वडील जागे झाले. खाली काय झाले ते डोकावून पाहताच चोरट्यांनी त्यांच्यावर जोरदार दगडफेक केली. त्यात त्यांच्या चेहर्याला गंभीर दुखापत झाली. श्वानपथकाची मदत दरम्यान, चोरट्यांनी कपाटातील ९ तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचा ऐवज लांबविला. रात्री साडेबारा वाजता कर्जत पोलिसांचा फौजफाटा कुळधरणमध्ये आला. श्वानपथकामार्फत माग काढला असता तो कोपर्डी जंगलाच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. हल्ल्यात जखमी झालेले पोपट सुपेकर व सुंदराबाई सुपेकर कुळधरण येथे उपचार घेत असून अरविंद सुपेकर यांना तात्काळ दौंड येथे हलविण्यात आले. (वार्ताहर) चोरट्यांच्या गावातील चोर्यांच्या सत्रांची माहिती पोलीस पाटील समीर जगताप यांनी कर्जत पोलिसांना दिल्यानंतर गावातील जगदंबा मंदिरावरील ध्वनीक्षेपकावरुन ग्रामस्थांना सावधानतेच्या सुचना दिल्या. त्यानंतर चोरटे कोपर्डी मार्गावरील सुपेकर वस्तीकडे गेले. तेथे बाळासाहेब सुपेकर वीस ते पंचवीस युवकांना एकत्र करुन थांबले होते. चोरटे दिसताच त्यांनी मोठ्याने आक्रोश करीत गज, काठ्या, कुºहाडी घेऊन चोरट्यांचा पाठलाग केला. गुंड, वारे वस्ती तसेच गावातील शेकडो लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. पहाटे चार वाजेपर्यंत शोधाशोध सुरु होती. मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
कुळधरणमध्ये घरफोड्या
By admin | Updated: May 24, 2014 00:39 IST