भेंडा : गळितास येणाऱ्या उसाला जिल्ह्यातील इतर साखर कारखाने व एफआरपीपेक्षा जास्त भाव देऊ, असे ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक, माजी आमदार नरेंद्र घुले यांनी जाहीर केले .भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ४३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ नरेंद्र घुले यांचे हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कारखाना अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे होते.प्रारंभी वाढीव १९.५ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचा ११० टनी बाष्पक व गव्हाणीची पूजा करण्यात आली. घुले म्हणाले, केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांचे देणे घेणे नाही. राज्याच्या सहकार मंत्र्यांचेच खासगी साखर कारखाने आहेत. खासगी साखर कारखानदारांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नसते. शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून होते. निर्मिती करणारे असंख्य हात एकत्र आले तर काय होऊ शकते, याचे ज्ञानेश्वर कारखाना उत्तम उदाहरण आहे.कारखान्याची दैनिक गाळप क्षमता आता ८ हजार मे. टनाची झालेली असल्याने भविष्यात १५ लाख मे. टन उसाचे गाळप पूर्ण करू. सर्वांचे सहकार्य व प्रयत्नांमुळे ज्ञानेश्वर कारखाना या गळीत हंगामात ६ लाख मे. टन उसाचे गाळप पूर्ण करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .कारखाना उपाध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले, १०० कोटी रुपये खर्चून १९.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभा केला आहे. ४५ बाय ९० ची नवीन मिल बसविल्याने दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ होणार आहे. सर्व ऊस वेळेत गाळला जाईल. सर्वांनी आपला व नातेवाईकांचाही ऊस ‘ज्ञानेश्वर’लाच देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमास संचालक मोहनराव देशमुख, कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, उस उत्पादक हजर होते. ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (वार्ताहर)
उसाला सर्वाधिक भाव देऊ
By admin | Updated: November 3, 2016 00:58 IST